लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराड : अंब्रुळकरवाडी- भोसगांव (ता. पाटण, जि . सातारा) लगतच्या डोंगराला लागलेल्या आगीत आंब्याची बाग वाचवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू मृत्यू झाला. तुकाराम सीताराम सिताराम सावंत (वय ६५ रा. अंब्रूळकरवाडी, ता. पाटण) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आग विझवण्यासाठी ते पड्यालचे पट्टे या शिवारात गेले आसता त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर यामध्ये सुमारे दीडशे झाडांची आंब्याची बागही जळून खाक झाली.

याबाबतची माहिती अशी की, वाल्मिक पठारावरील जौंजाळवाडी (ता. पाटण) या गावच्या हद्दीत चिरका नावाच्या शिवारात आग लागली उन्हाळ्याच्या तडाख्याने हा वणवा भडकून आगीने रौद्ररूप धारण केले, वाऱ्याच्या झोक्याने आग अंब्रूळकरवाडीच्या शिवारात घुसली याच गावच्या हद्दीतील पठारावर असलेल्या पड्यालला पट्टा नावाच्या शिवारात तुकाराम सावंत यांची आंब्याची बाग होती त्या बागेच्या जवळ आग आल्याचे समजताच तुकाराम सावंत यांनी बागेकडे धाव घेतली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला.

भर उन्हाचा तडाखा असल्याने बघता बघता आगीने चारी बाजूंनी तुकाराम सावंत यांच्या बागेला वेढा दिला, आग विझवण्याच्या प्रयत्नात आगीने सावंत यांनाही वेढले. हे त्यांच्या लक्षात आले नसावे. यावेळी शेजारीच आग विझवण्यासाठी आलेल्या अशोक पांडुरंग सावंत व त्यांच्या पत्नी सुनंदा अशोक सावंत यांनी आवाज देऊन, हाका मारुन त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना हा आवाज ऐकू गेला नाही.

आग भयंकर असल्याने संपूर्ण शिवार व परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यात तुकाराम सावंत यांचा होरपळून जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तुकाराम सावंत यांचा एकुलता एक मुलगा मध्यप्रदेश येथे सैन्यात सेवा बजावत आहे. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्यास आश्रू अनावर झाले आणि तातडीने तो गावाकडे यायला निघाला असे ग्रामस्थांनी सांगितले.

आगीची बातमी समजताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांनी घटनास्थळाला भेट दीली रात्री उशीरापर्यंत पंचनाम व कायदेशीर पूर्तता सुरु होती.

प्रतिकूल परिस्थितीत फुलवली होती बाग

अंब्रूळकरवाडी हे गाव जलटणांचा एक रस्ता असून पिण्याच्या पाण्याचीही तिथे भ्रांत राहत असताना, या पाण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना तुकाराम सावंत यांनी खांद्यावरून पाणी आणत आंब्याची बाग फुलवली होती जगवली होती. जंगली व वन्य प्राण्यांपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या होत्या. मात्र काल शुक्रवारी तळपत्या उन्हात डोंगरांचा वनवा त्यांच्या बागेपर्यंत पोहोचल्यानंतर कोणतीही परवा न करता त्यांनी आग आटोक्यात आणून आपली दीडशे आंब्याच्या झाडाची बाग वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून प्रयत्न केले परंतु बागही जळाली आणि त्यात तुकाराम सावंतही कोरफळून मृत्यूमुखी पावले त्यामुळे अंब्रूळकरवाडीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer dies by burns while saving mango orchard from fire in forest mrj