रत्नागिरी : शेजारच्या कोकण आणि कर्नाटकातून मासे आणण्यास गोवा सरकारने घातलेली बंदी अंशत: उठवली असली तरी अपुऱ्या पुरवठय़ामुळे ऐन नातळात गोव्यात विविध प्रकारची मासळी महागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परराज्यातील मासळीला गोवा सरकारने गेल्या १२ नोव्हेंबरपासून किमान सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ांमधील मत्स्य व्यवसायाला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला.

दक्षिण गोव्यात मासळी तपासणीची प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ परराज्यातील मासळीला प्रवेश बंदी असेल, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले होते. फक्त इन्सुलेटेड वाहनातून आणलेल्या मासे गोव्यात स्वीकारले जातील, असे त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छीमार आणि मासे व्यावसायिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसला. मात्र त्याचबरोबर गोव्यातील मागणीइतके मत्स्योत्पादन तेथे होत नसल्याने राज्यात कृत्रिम ‘मत्स्य दुष्काळ’ निर्माण झाला. स्थानिक खवय्यांबरोबरच माशांचे घाऊक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना त्याची विशेष झळ पोचली. अखिल गोवा फिशरमेन्स असोसिएशनने याबाबत प्रथम आवाज उठवला. त्यानंतर नाताळचा सण जवळ येऊ  लागला तसा हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांनीही गोवा सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यापुढे झुकत गोव्यापासून कर्नाटक आणि महाराष्ट्रात साठ किलोमीटर अंतरापर्यंतच्या छोटय़ा मत्स्य व्यावसायिकांना या बंदीतून वगळल्याची घोषणा आरोग्यमंत्री राणे यांनी गेल्या आठवडय़ात केली. त्यामुळे या दोन्ही राज्यांमधून गोव्यामध्ये काही प्रमाणात मासळी जाऊ  लागली आहे, पण नाताळच्या काळात येथे पर्यटक मोठय़ा संख्येने येत असल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत आहे. त्यातून माशाचे दर वाढले आहेत.

गोवा र्मचटस चेंबर अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, दिवाळीपासूनच राज्यातील माशाची मागणी आणि पुरवठा यामधील तफावत मोठी होती. शासनाने गेल्या आठवडय़ात अंशत: बंदी उठवल्यानंतर कारवार आणि कोकणातून पुरवठा सुरू झाला आहे. पण प्रीमियर गटातील किंग फिश, स्नॅपर, पॉम्फेट, टायगर प्रॉन्स इत्यादी  प्रकारच्या माशांचा तुटवडा कायम असल्यामुळे माशांचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मात्र या निर्णयाचा फायदा मिळू शकलेला नाही. रत्नागिरी तालुक्यासह हर्णै, नाटे या बंदरांमधून दर दिवशी एकूण उत्पादनाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त मासळी गोव्याकडे जात होती; मात्र ही वाहतूक सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर थांबवली जाऊ  लागल्यामुळे दर आठवडय़ाला सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. याचा परिणाम स्थानिक बंदरातील मासळीच्या दरांवर झाला आहे.

सिंधुदुर्गातील मच्छीमारांना लाभ

’सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघटनेचे सचिव दिलीप घारे यांनी सांगितले की, सौंदळा, पापलेट, सुरमई इत्यादी प्रकारचे मासे गोव्यात जाऊ  लागले आहेत.

’संपूर्ण जिल्ह्य़ातून मिळून

सुमारे ३५ ते ४० टन मासळी तिकडे जाऊ  लागली आहे.  त्यातून चांगला दर मिळत असल्याने प्रति दिवशी सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होऊ  लागली आहे.

’गोव्यातून सध्या मागणी इतकी वाढली आहे की स्थानिक बाजारपेठेत ताजा मासा मिळणे मुश्कील झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa in december 2018 fish expensive in goa during christmas