धाराशिव: आई राजा उदोऽऽ उदोऽऽ या जयघोषाने कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारी प्रारंभ झाला. मंदिरात पहाटे पारंपारिक पद्धतीने तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्य, संबळाचा निनाद, महंत, पुजार्‍यांच्या मंत्रोच्चाराने तसेच आई राजा उदो-उदोच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरूवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास नवरात्रोत्सवापूर्वीची नऊ दिवसांपासूनची देवीची मंचकी निद्रा समाप्त झाली. त्यानंतर देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. नित्योपचार पूजा, आरती झाल्यानंतर दुपारी १२ वाजता घटकलशाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून घटकलशांची घटस्थापना देवीजींच्या गाभार्‍यात करण्यात आली. तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.

हेही वाचा : वीस दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान, वालावलकर रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश

यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, महंत तुकोजी बुवा, महंत हमरुजी, वाकोजी बुवा, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळ, पदाधिकारी, सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, अमोल भोसले, विश्वास कदम उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv tuljabhavani temple navratri festival started after puja on the first day css