अलिबाग – रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. त्यामुळे महाड आणि रोहा शहरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
महाबळेश्वर आणि पोलादपूरच्या खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. महाबळेश्वर परिसरात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात १५९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर पोलादपूर येथे १३४ मिमी, महाड येथे १४५ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर या परिसरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सावित्री नदीने दुपारी २ च्या सुमारास इशारा पातळी ओलांडली. सायंकाळी ५ वाजता ती ६.५० मीटरची धोका पातळी गाठली. त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. शहरात पुराचे पाणी कुठल्याही क्षणी शिरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाड शहर आणि लगतच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा – रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला पडले मोठे भगदाड
भिरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने डोलवाहल बंधारा येथे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदी २३ मीटरच्या इशारापातळीवरून वाहत असल्याने, रोहा शहर आणि त्यालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पौर्णिमा असल्याने आज रात्री समुद्राला मोठी भरती येणार आहे. अशात पावासाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाण्यात मोठा फुगवटा तयार होऊ शकणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाताळगंगा, आंबा आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. अलिबाग, तळा, पेण आणि महाड येथे घरांची पडझड झाली आहे.
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यत म्हसळा १४४ मिमी, माथेरान १०२ मिमी, तळा १२४ मिमी, श्रीवर्धन १५५ मिमी नोंदविला गेला आहे. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत महाबळेश्वर १४५ मिमी, महाड ६२ मिमी, पोलादपूर १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
© The Indian Express (P) Ltd