लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन्ही गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झाले. हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका अशी विनंतीही मी महाराष्ट्रातील जनतेला करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज ठाकरे यांनी बुधवारी ट्विट केले आहे. राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये राज्यातील जनतेला उद्देशून पत्रक पोस्ट केले आहे. यात राज ठाकरे म्हणतात, राज्यात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय असल्याने सर्वांचेच दुष्काळ आणि बेरोजगारी या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ जास्त गंभीर आणि भीषण आहे, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळत असतानाच शहरांमध्ये  संघटित आणि उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण- तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये पगार वेळेवर होत नसतील तर खासगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या दोन्ही विषयात सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनीही काटेकोरपणे या दाव्यातील तथ्य तपासायला हवे. निवडणुका येतील, जातील पण त्याच्यापलीकडे जाऊन आपल्याला या विषयांकडे बघायला हवं. सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेऊन आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय गंभीर असल्याने मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray reaction on maharashtra day labour day