Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडी या ठिकाणी ध्वजारोहण केलं. त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी धर्माची व्याख्या सांगितली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचही नाव त्यांनी घेतलं. तसंच त्यांनी ध्वजारोहणाचं महत्त्व सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देश समृद्ध करायचा असेल तर…

आपला देश समृद्ध करायचा असेल तर भक्ती आणि ज्ञानपूर्वक कर्म करावं लागेल हा ध्वजारोहणाचा संदेश आहे. आपल्या देशाचा जो तिरंगा झेंडा आहे त्याच्या केंद्रस्थानी धम्मचक्र आहे, धर्म. धर्माचा एक अर्थ पूजा असाही असतो. पण तोच धर्म नाही. पूजा अर्चा करणं या गोष्टी धर्माचं आचरण आहेत. देशःकाल परिस्थिती प्रमाणे या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे आणि तो होतोही.

शाश्वत धर्म म्हणजे काय?

शाश्वत धर्म म्हणजे काय? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत संविधान देत असताना त्यांनी जे भाषण केलं त्यावेळी त्यांनी एका वाक्यात धर्म या शब्दाची व्याख्या केली आहे. बंधूभाव म्हणजेच धर्म असं आंबेडकर यांनी सांगितलं आहे. आपला समाज सद्भावनेच्या आधारावर उभा आहे. आपला धर्म सांगतो विविधता ही निसर्गाची देणगी आहे. आपलं महत्त्व जरुर जपा, पण देशाची एकता अबाधित ठेवा, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. विविधता असलेल्या इतर देशांमध्ये वाद होताना आपण पाहतो. मात्र भारताचा मूळ स्वभाव हा विविधतेतली एकता आहे. असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

समाजाने प्रयत्न केला तर देश महान होतो-मोहन भागवत

तुम्ही आनंदी असाल आणि घरात दुःख असेल तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही. हीच व्याख्या गाव, शहर, राज्य यांनाही लागू होते. एक राज्य दुःखी असेल तर देश आनंदी राहू शकत नाही. आपल्याकडे लोक म्हणतात व्यक्तीला मोठं व्हायचं असेल तर स्वातंत्र्य हवं, समता हवी मात्र हे कधी घडेल जेव्हा बंधूभाव वाढेल. कुठलाही माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो बंधूभाव जपतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. आपल्या राष्ट्राच्या ध्वजात जे धम्मचक्र आहे तो आपला धर्म आहे. ते चक्र सगळ्यांच्या समानतेचा, बंधूभावाचा संदेश देत आहे. सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा संदेश ते चक्र देतं. आपल्याला या गोष्टी लक्षातच ठेवावी लागेल. एकट्याच्या प्रयत्नाने राष्ट्र मोठं होत नाही. समाज प्रयत्न करतो म्हणून देश महान होतो. असंही मोहन भागवत म्हणाले.

आपली चिंता अनेकांना होती, पण आपण…

आपण स्वतंत्र झालो तेव्हा भारताचं काय होणार, यांना गुलामीत जगायचीच सवय लागली आहे असा प्रश्न सगळ्या जगाला पडला होता. आपल्यावर झालेली आक्रमणं आपण सहन केली. पण आपण या परिस्थितीतून बाहेर आलो. १९७१ मध्ये आपण जेव्हा युद्ध जिंकलो तेव्हा सगळं जग आपल्याकडे आदराने पाहू लागलं होतं. पोखरण १, पोखरण २ झालं तेव्हा आपल्या देशाची चर्चा जगात झाली असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan bhagwat speech in bhiwandi he took babasaheb ambedkar name and told what is religion scj