सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे. तब्बल जून महिना पावसाने दांडी मारल्याने भातशेतीचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. जिल्हा आपत्कालीन कक्षात आज सकाळपर्यंत सरासरी ४.८५ मिमी. एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. मात्र कालपासून पाऊस कोसळत आहे. शहरी भागात पर्जन्यमापक नसल्याने पावसाची नोंद झालेली नाही. मात्र ग्रामीण भागात बऱ्यापैकी पाऊस कोसळला असल्याचे सांगण्यात आले. काल बुधवारी मुंबापुरीला झोडपल्यानंतर हा पाऊस सिंधुदुर्गात दाखल झाला. सावंतवाडी तालुक्यात या पावसाने दिवसभर झोडपून काढले. त्यामुळे सर्वाचीच धावपळ उडाली असली तरी शेतकरी मात्र काही प्रमाणात सुखावला आहे. जिल्ह्य़ात भातशेतीचे वेळापत्रक मिरगाच्या पावसाच्या अगोदरपासून वळवाच्या पावसाने सुरू होते. पण हे वेळापत्रक यंदा कोलमडून गेले आहे. सुरुवातीला बिगरमोसमी पावसाने झोडपले, पण नंतर वळवाच्या पावसाने दांडी मारत पावसाचे आगमन झाले. मात्र या पावसाने शेतकऱ्यांनी तरवा पेरणी केली. जिल्ह्य़ात भातलावणी हंगाम असला तरी जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने तरवा लावणीचे वेळापत्रक कोलमडले तसेच भात रोपे जळून गेली तर करपा रोग, किडीचा प्रादुर्भावही झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या पावसाने शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon starts in sindhudurg