नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० जुलै रोजी ऐरोलीत ही घटना घडली. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलीने आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पीडित ४१ वर्षीय महिला वारंवार मुलीच्या मागे लागली होती. यामुळे दोघींमध्ये जोराचं भांडण झालं होतं

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना ३० जुलै रोजी घडली असली तरी गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुलीने आईविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावलं होतं.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने नीट परीक्षेसाठी तयारी करावी यासाठी महिला तिच्या मागे लागली होती. मुलीने डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरुन दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. मुलीने आईला धक्का दिल्या, ज्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. “मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवला आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरुन मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेत असं तिने मेसेजमध्ये लिहिलं होतं,” अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे.

शवविच्छेदन केलं असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं उघड झालं. “महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेतलं असता तिने हत्येची कबुली दिली,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai teen kills mother strangulating with a karate belt for asking her to study sgy