राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याला हा वाद वाढवायचा नाही असं सांगितलं आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. दरम्यान रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. हा माझा विषय नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं असून, मी त्यासाठी जात आहे,” असं त्यांनी मुंबईला निघण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो,” असंही त्यांनी सांगितलं.

‘तुम्ही बच्चू कडूंना घरात घुसून मारेन का म्हणालात?’ रवी राणांनी दिलं उत्तर, म्हणाले “जर तलवारीने कोथळा काढत…”

“मी घरी त्यांची पत्नी आहे, पण बाहेर सेवक आहे,” असं सांगत त्यांनी वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. वादामुळे जनतेचे प्रश्न मागे पडत आहेत असं विचारलं असता “ते सिनिअर आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं,” असं त्या म्हणाल्या.

रवी राणांची पुन्हा नरमाईची भूमिका

“वाद पूर्णपणे मिटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून बैठकीनंतर लगेचच मी तो वाद मिटल्याचं जाहीर केलं,” असं रवी राणा उपमुख्यमंत्री भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘घरात घुसून मारेन’ वक्तव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, ते वक्तव्य कोणासाठी नव्हतं. कोणी जर आम्हाला मारु, कोथळा काढू, हात छाटून टाकू, तोंड रंगवू असं धमकावत असेल, त्यांच्यासाठी हे वक्तव्य होतं. ते वक्तव्य कोणालाही उद्देशून नव्हतं. कोणी जर तलवारीने आमचा कोथळा काढत असेल, मारुन टाकत असेल तर जीव वाचवण्यासाठी ते करावं लागतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana on husband ravi rana and bachchu kadu conflict sgy