महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यापुढे पूर्ण पोशाखात येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले असतानाच यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. मंदिरात तोकड्या वेशात जाण्यास मज्जाव करण्याऐवजी कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. आपण २१ व्या शतकात असताना असे निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मूक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भाजपा सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, भाजपाने निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या, पण पारदर्शक कारभार दिसत नाही. त्यांच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जातात ही निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, आपण २१ व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली.  विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, जेलमध्ये टाकले जाते. तर दंगल घडवणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कालवा फुटीचे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader supriya sule reaction on kolhapur mahalakshmi temple dress code