प्रकाश खाडे
सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची भर सोमवती अमावस्या यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोमवती यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला होता. या यात्रेसाठी कोणीही भाविकांनी जेजुरीत येऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले होते त्यामुळे आज जेजुरीत सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी सहा वाजता मोजके पुजारी, मानकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा म्हाळसादेवी च्या मुर्तींना दहीदुधाचा अभिषेक झाल्यानंतर कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यात आले. सोमवतीला दरवेळी पालखी वाजत गाजत कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेली जाते परंतु यावेळी नदीवरून पाणी खंडोबा गडावर आणण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, अशोक खोमणे, मयुर दिडभाई, अविनाश सातभाई आदी उपस्थित होते. मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांंच्या उपस्थितीत सोमवती सोहळा पार पडला. यात्रेनिमित्त खंडोबाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. वर्षातून दोन वेळा सोमवती यात्रा भरते. प्रत्येक यात्रेला राज्यातून चार ते पाच लाख भाविक येतात कऱ्हा स्नानासाठी खंडोबा गडावरून वाजत गाजत देवांची पालखी निघते. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भाविक मोठ्या श्रद्धेने लाडक्या खंडेरायाच्या पालखीवर भंडार खोबऱ्याची प्रचंड उधळण करतात. यामुळे सारा परिसर सोन्यासारखा पिवळाधमक होऊन जातो. देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्तीचा साऱ्यांनाच प्रत्यय येतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे हा सारा सोहळा भाविकांना व ग्रामस्थांना अनुभवता आला नाही, ना गडावर भंडाऱ्याची उधळण झाली, ना भाविकांची ललकारी घुमली.

गडाबरोबरच सारी जेजुरी नगरीही आज शांत होती. पालखी सोहळा न निघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वृद्ध भक्तांनी सांगितले. खंडेरायाची पालखी अवघड आहे ती खांद्यावर घेणारे मानकरी, खांदेकरी ठरलेले असतात. आज आपल्याला खंडोबाच्या स्वारीला खांदा देता आला नाही याची रुखरुख अनेकांना लागली. राज्यातील अनेक घरांमध्ये दर सोमवतीला जेजुरीच्या खंडेरायाला देव भेटीला नेण्याची पद्धत आहे. यावेळी मात्र कोरोनामुळे भाविकांना येता आले नाही. त्यातूनही काही भाविक जेजुरीत आलेले दिसले परंतु त्यांना मुख्य रस्त्यावरच पोलिसांनी अडवले. त्या ठिकाणी खंडोबा देवस्थानने मोठी स्क्रीन बसवली आहे. यातून खंडोबा दर्शन दिले जाते. येथेच लोकांनी भंडारा खोबरे वाहून अत्यंत भक्तिभावाने देवाला नमस्कार करून परतीची वाट धरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खंडोबा गडावर इतर कोणालाही जाऊन दिले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No bhandara in jejuri on somvati amvasya pooja scj