लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळताना लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक ठरल्या वेळेतच होईल. असे त्यांनी ठामपणे सांगितले. कराडच्या विश्रामगृहामध्ये मुक्कामी असलेले चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार उदयनराजे भोसले, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्री मंगळवारी दिवसभर सातारा व सांगली जिल्हय़ाच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, सातारा, इस्लामपूर, विटा, कडेपूर, कराड आदी ठिकाणचे कार्यक्रम, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या गाठीभेटी आटोपल्यानंतर ते कराडच्या विश्रामधाममध्ये मुक्कामास होते. गेल्या दहा दिवसांपूर्वीचा त्यांचा दौरा धावता राहिल्याने कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांच्या भेटीसाठी व त्यांना निवेदन सादर करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज शिक्षक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. डॉ. अतुल भोसले यांनीही कार्यकर्त्यांच्या झाशात मुख्यमंत्र्यांना भेटताना विविध कामे सुचविली. राजकीय कानगोष्टीही केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दगडखाण कर्मचारी, कराड पालिकेचे पदाधिकारी यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लहानमोठय़ा नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विश्वासू सहका-यांशी चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रामास्वामी एन., प्रांताधिकारी संजय तेली प्रशासकीय अधिका-यांशी प्रस्तावित विकासकामांसंदर्भात चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. विकासकामात हयगय नको, कामे दर्जेदार व वेळेत व्हावीत अशा सक्त सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No election of assembly with lok sabha