संगमनेर : आपण चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहोत. मात्र इतके वाईट राजकारण कधीही पाहिले नाही. जनतेमध्ये या सरकारविरुद्ध मोठा रोष आहे. बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या सरकारने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आमदार थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी लावत, काळे झेंडे घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, ॲड. माधवराव कानवडे, शिवसेनेचे अमर कतारी, आप्पा केसेकर, इसाकखान पठाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्त्याची मागणी, हडपसर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – Pune Paud Helicopter Crash: पुण्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिक किरकोळ जखमी, तीन प्रवासी सुखरूप

आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, बदलापूरची घटना ही अत्यंत लांछनास्पद आहे. संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांची साथ मिळाली. मंत्रालयामधून दबाव होता की काय असे महाराष्ट्राला वाटत आहे. लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे. मंत्रिमंडळ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन करत आहे. मात्र या बहिणीचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मागच्या आठ दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत. प्रशासनाचा धाक राहिला नाही. मंत्रालयात सर्व फक्त टक्केवारीत गुंतले आहेत. बदलापूरमध्ये जनता एकत्र येऊन निदर्शने करत होती. सत्ताधारी मात्र त्याला राजकीय हेतू म्हणतात हे चूक आहे. न्यायालयाचा मान राखत आम्ही मूक आंदोलन केले. यालाही आता राजकीय हेतू म्हटला जात आहे. खरे तर हे सरकारच दुर्दैवी राजकारण करत आहे. राज्यात बालिका व महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच कायदा सुव्यवस्था ढासळलेल्या महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President rule should be implemented in maharashtra demand congress leader mla balasaheb thorat ssb