सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कायर वादळामुळे अतिवृष्टी झाली व मोठय़ा प्रमाणात भातपिकाबरोबर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मच्छीमारी नौका नुकसान झाले आहे, त्यामुळे कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत भेट घेऊन केली आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजपासून पाहाणी करून दोन दिवसांत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील महसूल यंत्रणेची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे केसरकर यांनी सांगितले .

या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठय़ा धर्याने तोंड दिल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. या शेतकऱ्यांना १५००० हेक्टरी अनुदान चांदा ते बांदा योजनेतून देण्यात येईल, असे राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत यांच्यासह मी, आमदार वैभव नाईक  राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी भेट घेऊन ओल्या दुष्काळाची मागणी केली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचे सांगितले. पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, या दुष्काळामध्ये आपदग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे, बीबियाणे चांदा ते बांदाअंतर्गत देण्यात येणार आहेत, दरम्यान शेतीनुकसानीसाठी अनुदानात तिप्पट वाढ करण्यात आली आहे, या परतीच्या पावसात वादळात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनाही या नुकसानीत मदत करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान या वादळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली असून भाताला कोंब आले आहे. त्यामुळे पुढे हंगामामध्ये मिळणाऱ्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निवड झालेला आहे.

या ओला दुष्काळाच्या प्रश्नाबाबत कोकण विभागीय आयुक्तांशी चर्चा केली असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या वेळी बोलताना सांगितले. मच्छीमाऱ्यांच्या होडय़ा जाळी वाहून गेल्या, तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण या नुकसानीची पाहणी करत असताना किनारपट्टीची आज पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. दिवाळीच्या तोंडावर आलेले हे अस्मानी संकट असून शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी या संकटाचा सामना मोठय़ा धर्याने केल्याबद्दल त्यांनी सर्वाचे कौतुक केले. आजच्या दौऱ्यानंतर आपण मालवण आणि वेंगुल्रे या किनारपट्टीचाही दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर केंद्र शासनाची मदत आपसूकच मिळणार आहे; परंतु तत्पूर्वी राज्य शासन स्तरावर मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना उभा करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटात त्यांनी धर्याने तोंड दिले. त्यांचे हे धर्य असेच अबाधित राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Request for cm to declare drought in konkan abn