वाई : हरिनामाचा गजरात वैष्णवांचा मेळा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर होऊन साताऱ्यातील शेवटच्या बरड मुक्कामी

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत एक दिवसाच्या मुक्कामाकरीता साताऱ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी फलटण तालुक्यात बरड येथे विसावला.

( संग्रहित छायचित्र )

विश्वास पवार
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत एक दिवसाच्या मुक्कामाकरीता साताऱ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी फलटण तालुक्यात बरड येथे विसावला.” साधू संत येती घरा , तो चि दिवाळी दसरा ” या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाला होता .फलटण बरड मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत आपल्या लाडक्या माऊलींचे जंगी स्वागत केले .

पंढरीसी जावे एैसी माझे मनी I
विठाई जननी भेटे केव्हा II
संपती सोहळा ना आवडे मनाला I
लागला टकळा पंढरीचा | I

या अभंगाच्या अर्थाप्रमाणे पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाल्याचे दिसून आले .
कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्याचा लोणंद तरडगाव येथील मुक्कामानंतर फलटण येथील दोन दिवसांचा मुक्काम आटोपुन आज सकाळ येथुन सोहळ्याने बरड च्या दिशेने प्रयाण केले. हरिनामाच्या गजरात पुन्हा नवा उत्साह घेवुन वारकरी यांनी आपल्या दिंड्या नंबरप्रमाणे लावुन विठुरायाच्या जयघोषात पुढे मार्गस्थ केल्या होत्या. टाळमृदुंग, हरिनामाचा गजर, अभंग जणु स्पर्धात्मकरित्या गात-गात पालखी सोहळा विडणी येथे नाष्टा, पिंपरद येथे दुपारचे जेवण, वाजेगाव व निंबळक नाका येथे विश्रांती घेतली. या नंतर बरड येथील पालखी तळावर सोहळ्याचा मुक्कामासाठी दाखल झाला, यावेळी भाविकांच्या दर्शनासाठी पालखी अनेक ठिकाणी थांबविण्यात आली दरम्यान पंढरपूर मार्गावरील विविध गावातील व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच झुंबड उडवली होती.

जेवनाचा आस्वाद घेतल्यानंतर पालखी सोहळा बरड च्या दिशेने पुढे सरकला. या वेळी आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या भेटीतील जवळजवळ अर्धेहुन अधिक अंतर उरकल्याने अगदी आनंदी दिसत होता.पुणे, सातारा जिल्ह्यातील आपला मुक्काम संपवून विठुरायाच्या सोलापूर जिल्ह्यात उद्या प्रवेश करणार आहे.शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या भेटीतून आनंदी झालेले व विदर्भ, मराठवाडा, खान्देश व ईतर या भागातून लाखो वारकरी भाविक आपल्याकडे पाऊस पडतो आहे का याची माहिती घेत होते तर या निरोपाचा आनंद काहींच्या चेहऱ्यावर दिसत होता. मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र अजून पाऊस पडावा असे साकडे आपल्या पांडुरंगाला घालीत होते.

पावसाची पुर्णतः उघडीप असल्याने बरड व परिसरातील भाविकांना माऊलींचे भक्तीभावाने दर्शन घेता येणार आहे या ठिकाणी पालखी विसावल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठया रांगा लावल्या होत्या या वेळी महसूल विभागाच्या वतीने चोख व्यवस्था केली होती,कायदा सुव्यवस्था राखव्यासाठी मुख्य मुक्कामाच्या ठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.बरडहून पालखी सोहळा धर्मस्थळ येथून सोमवारी नातेपुते सोलापूर येथे प्रवेश करणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sant tukaram palkhi arrived in satara amy

Next Story
अमरावती पोलीस आयुक्तांची चौकशी व्हावी : नवनीत राणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी