तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशी चिंता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. वाहतुकीची साधने कमी प्रमाणात वापरणे किंबहुना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी, गोबर गॅसचा वापर, जल व वायू प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा जिल्हा बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल वॉर्मिंग -ग्लोबल वॉर्निंग परिसंवादाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. या कार्यक्रमात सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पर्यावरण तज्ञ खा. वंदनाताई चव्हाण, बँकेचे अध्यक्ष  नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील,  शेखर गोरे, दत्तानाना ढमाळ, सत्यजित पाटणकर, सुरेश सावंत,प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

बदलत्या वातावरणासाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगत, सांडपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन केले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बेसाल्ट खडकामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. वाहतुकीसाठी बसचा वापर करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा व सायकलचा वापर करणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

“सातारा जिल्हा बँकेने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला ही बाब देशाच्या दृष्टीने भूषणावह आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेक विविध योजना राबविल्या आहेत. यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, वंदनाताई चव्हाण, मदनगोपाल वार्ष्णेय, डॉ. शेखर कोवळे, मृण्मयी देशपांडे, डॉ. अविनाश पोळ यांनी या विषयावर आपले विचार व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रास्ताविक केले तर अभिनेता आमिर खानने ऑनलाईन उपस्थित राहून पर्यावरणविषयक आपले मत व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara we need to be careful about global warming says aditya thackeray abn