तारळी नदीत पोहायला गेलेल्या संतोष दीपक भांदिर्गे (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) या इयत्ता सातवीतील शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तारळे येथे घडली. या घटनेची खबर राजकुमार वसंतराव भांदिर्गे (ता. तारळे) यांनी उंब्रज पोलिसात दिली आहे.
शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागल्याने शाळकरी मुलांची पोहण्यासाठी तारळी नदीत गर्दी होत असते. सकाळी संतोष भांदिर्गे हाही आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. या वेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष नदीपात्रात बुडू लागला. त्याला बुडताना पाहताच नदीकाठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील सचिन राऊत, मिलिंद कुंभार, प्रशांत भांदिर्गे, संतोष दळवी, पोपट गायकवाड, प्रशांत ढवळे यासह अनेक नागरिकांनी नदीकडे धाव घेत पाण्यात उडय़ा घेऊन संतोषला पाण्यातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School boy dies while swimming in the river