सोलापुरातील दुष्काळी भागाची पाहणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. सांगोला तालुका तसा कायमस्वरूपी दुष्काळीच. या भागात यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पाण्याअभावी पिके जळत आहेत. जनावरे कसायाच्या दावणीला बांधण्याची वेळ आली आहे. ही गंभीर परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारकडे मांडणार आहे. सरकारने संवेदशीलता दाखवत दुष्काळी भागाला दिलासा दिला नाही तर शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

पवार मंगळवारी सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील यलमार मंगेवाडी व अजनाळे आदी गावांमध्ये कोरडी पडलेली शेततळी, जळालेल्या डाळिंबाच्या बागा, मुक्या जनावरांसाठीच्या चारा छावण्यांची पाहणी केली. त्यानंतर अजनाळे येथे गावकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी तोंड देताना येणाऱ्या अडचणींसह अनेक समस्या मांडल्या. महाविद्यालयीन तरुणांशीही पवार यांनी संवाद साधला. दुष्काळी भागात शिक्षण घेताना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. चार वर्षांपासून शिष्यवृत्ती रक्कमही हातात पडत नाही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.

पवार यांनी आपल्या पाहणी दौऱ्यात स्थानिक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बोलते करून त्यांच्या अडचणी जाणून घेताना तरुणांशीही मिश्कीलपणे संवाद साधला. परीक्षा शुल्क माफी नाही, केवळ घोषणाच होतात, अशा अडचणी मांडणाऱ्या तरुणांची विचारपूस करताना पवार यांनी त्या तरुणाच्या हातातील मोबाइल, कंबरेला अडकवलेली चावी, मनगटात अडकवलेले घडय़ाळांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. वडील गवंडीकाम करीत असलेल्या एका तरुणाने आपणांस बँकेकडून कर्जमाफीची केवळ सूचना मिळाली. परंतु आपण कर्जच घेतले नव्हते. कारण आपण शेतकरीच नाही. आपल्या मालकीची शेतजमीनसुध्दा नाही. असे असताना शेती कर्जमाफी झाल्याचा संदेश आपल्या भ्रमणध्वनीवर आल्याचे सांगितले, तेव्हा प्रशासनातील ढिसाळपणाबद्दल एकच हंशा पिकला.

दरम्यान, पवार आज सोलापुरात मुक्काम करत उद्या मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागाची पाहणी करणार होते. परंतु माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हणमंत डोळस यांचे मुंबईत निधन झाल्याची वार्ता आली. तेव्हा पवार यांनी  आपला नियोजित कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रयाण केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar will present the critical situation to the government