धाराशिव : येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपुरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळही लागणार आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि गरजू तरुणांना जिल्ह्यासह राज्य आणि देशात सहज रोजगार मिळावेत यासाठी तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यपीठाच्या सहकार्याने यासह पुढील महिनाभरात जावा सारखे महत्वपूर्ण आणि अल्पमुदतीचे, रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने पुढे जात आहेत. विविध योजना,प्रकल्प, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात ३५ हजार रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार पुढील एक-दोन वर्षात आपल्याला मोठे कुशल मनुष्यबळ लागणार आहे. या अनुषंगाने स्थानिक युवकांना आधुनिक, एकात्मिक आणि व्यापक असे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन कौशल्यधारीत शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्यासाठी तुळजापुरात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना आपण मांडली असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”

तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा अनुषंगाने पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यपीठचा नुकताच दौरा केला. विद्यपीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुझुमदार यांच्याकडून सिम्बायोसिसमार्फत चालविल्या जात असलेल्या कौशल्य विद्यापीठाची माहिती जाणून घेतली. या कौशल्य विद्यापीठात कोणते अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या उपक्रमांची रूपरेषा काय याची विस्तृत सादरीकरण सिम्बायोसिसच्यावतीने करण्यात आले व तुळजाभवानी कौशल्य विद्यपीठाचा मास्टरप्लॅन करण्याचे ठरले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ आणि तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात लवकरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल तसेच ‘जावा’ सारख्या कमी कालावधीच्या व लगेच नोकरी मिळेल अशा कोर्सची लगेच सुरुवात केली जाईल. त्यानंतर सिम्बायोसिसचे अनुभवी आणि तज्ञांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील एकूण भौगोलिक परिस्थिती, जिल्ह्यातील शेती आणि त्यावर आधारित शेतीपूरक उद्योग आदी बाबींची सखोल माहिती घेऊन कृषी-व्यवसाय, पर्यटन आणि अपारंपारिक ऊर्जा सारखे डिप्लोमा/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut on Saif Ali Khan : “वैद्यकीय चमत्कार “, रुग्णालयातून ५ दिवसांत घरी परतलेल्या सैफबद्दल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “चाकू कितीही…”

कौशल्य विद्यापीठ हे उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण निर्माण करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण, स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन, नोकरीवर आधारित प्रशिक्षण, याला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष विद्यापीठ असणार आहे. त्यातून प्लेसमेंटही मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रशिक्षणानंतर, मूल्यांकन यंत्रणेमार्फत मूल्यांकन करून पात्र तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skill university will be established in tuljapur symbiosis skills university will provide technical assistance information of ranajagjitsinha patil ssb