जालना : बाजारभावापेक्षा शासनाचा हमीभाव अधिक असल्यामुळे १ कोटी २ लाख ३८ हजार रुपयांच्या २ हजार ९३ क्विंटल सोयाबीनची बनावट सातबारा, उतारा व पेरणी क्षेत्र दाखवून खरेदी केल्याप्रकरणी भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड या गावातील एका सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि संबंधित व्यापारी, अशा दहा जणांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वीर छत्रपती बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भागवत दौड, सचिव सुनील शिंदे त्याचप्रमाणे अन्य संचालक आणि व्यापारी पवन वाघ अशा दहा जणांच्या विरोधात बनावट दस्तावेज तयार करून सोयाबीन खरेदी व्यवहारात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भाने एका शेतकऱ्याने पणनच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार केली होती.
शासनाच्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करण्याचे ‘नाफेड’चे केंद्र वीर छत्रपती बेरोजगार सहकारी संस्थेकडे होते. २०२४-२०२५ मध्ये या संस्थेने ‘नाफेड’ साठी एकूण ३९ हजार ३७९ क्विंटल सोयाबीन खरेदी केले. यापैकी २ हजार ९३ क्विंटल सोयाबीन बनावट सात-बारा उतारा आणि त्यावर बनावट पेरणी क्षेत्र दाखवून संस्था आणि संबंधित व्यापाऱ्याच्या संगनमताने खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप आहे. शासकीय खरेदीचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल तर बाजारातील भाव यापेक्षा कमी म्हणजे ४ हजार १०० रुपये होता.