पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावात रविवारी दुपारी ‘टोरनॅडो’ वादळ पहायला मिळाले. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात मोठ्याप्रमाणात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि अचानक काळ्याकुट्ट ढगांमधून चक्रीवादळाप्रमाणे फिरणाऱ्या ढगांची शेपटी जमिनीपर्यंत खाली आली याचे आकारमान खूप मोठे होते. निसर्गाचा हा वेगळाच प्रकार पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले. तर काहीजण घाबरले देखील. अनेक ग्रामस्थांनी या वादळाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. नंतर ही बातमी संपुर्ण तालुक्यात पसरली. वादळसदृश्य शेपटी जास्त मोठी झालेली होती व शेपटीच्या भोवती अजुबाजुचे ढग गोलाकार फिरत होते. टोरनॅडो वादळ पाहणारे स्थानिक रहिवाशी संदिप बनसोडे यांनी पावसाचा जोर वाढल्यानंतर हे वादळ विरून गेल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पर्यावरण तज्ज्ञ व जल अभ्यासक डॉ.अभिजीत घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा वादळाचा तीव्र प्रकार असून, याला ढगांची जाडी जास्त असते. उच्च तापमानामुळे जमीन तापते व ढगातून एक सोंड खाली येते. यातून टोरनॅडो वादळ तयार होते. या वादळाचा वेग फार तीव्र असतो. जमिनीवरील वस्तुही उचलून आकाशाकडे झेपावतात. अमेरीका, मेक्सिको, रशिया, ब्राझिल, जपान, चीन आदी देशात अशी वादळे नेहमी होतात. तर आपल्याकडे गंगेच्या खोर्‍यात व बंगालमध्येही वादळाचे असे प्रकार पहायला मिळतात. सहा महिन्यांपुर्वी औरंगाबाद जिल्ह्यात असे वादळ आले होते. दोन वेळा तालुक्यात ‘टोरनॅडो’ वादळ झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दिवसभर याचीच चर्चा होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tornado storm in pisarve village in purandar taluka msr