सोलापूर : करमाळा शहराजवळ आहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून दोघा बंधुंना अटक केली. आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यामुळे चिडून दोघा भावांनी अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९, रा. अडसुरे, ता. येवला, जि. नाशिक) असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे. त्यांचे बंधू संभाजी चव्हाण यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात सुनील शांताराम घाडगे (वय २८) आणि राहुल शांताराम घाडगे (वय ३०, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या बंधुंसह अन्य एका महिलेचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. घाडगे बंधुंना अटक करण्यात आली असून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा >>> संगमनेरमध्ये दगडफेक-गाड्यांची तोडफोड कुणी केली? समनापूरचे प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा म्हणाले…

आपल्या आईबरोबर मृत श्रावण चव्हाण याचे असलेले अनैतिक संबंध उजेडात आल्यामुळे दोघे घाडगे बंधू चिडले होते. त्यांनी एका महिलेला सोबत घेऊन श्रावण चव्हाण याच्या खुनाचा डाव रचला. त्याप्रमाणे त्यांनी श्रावण चव्हाण यास गावात बोलावून घेतले. नंतर एका महिलेसह घाडगे बंधुंनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. नंतर त्याच्याच स्विफ्ट मोटारीत मृतदेह घालून दूर अंतरावर करमाळा भागात आणून माळरानावर टाकून दिला. मोटारीसह मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी कौशल्याने तपास करून गुन्हा उजेडात आणला. या गुन्ह्यातील तिस-या महिला आरोपीला अटक करायची आहे. खून कोणत्या हत्याराने केव्हा आणी कोठे केला ? गुन्ह्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे ? मृतदेह आणि मोटार कशी पेटविली ? मृतदेह मोटारीत टाकून कोणत्या मार्गाने आणला, याची उकल करावयाची आहे. तसेच  मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासायचे आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two brothers killed mother lover over immoral relationship zws