जालना : अंबड येथील ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ओबीसींच्या मागणीशी अनुकूल असल्याचा उल्लेख केल्याने थोडावेळ गोंधळ उडाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांनी नागपूर येथे ओबीसींचा मोर्चा काढला त्या वेळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले आणि ओबीसी आरक्षणात इतरांना वाटेकरू होऊ देणार नाही, असे आश्वासन होते, असे आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी उभे राहून याबद्दल आक्षेप घेतला. देशमुख यांचे भाषण आटोपल्यावर संचालन करणाऱ्याने याचा उल्लेख करून सर्व वक्त्यांना सांगितले की, येथे सर्वजण ओबीसी म्हणून आलेले आहेत. त्यामुळे येथे कुणीही आपल्या भाषणात राजकीय पक्षाचा उदो उदो करू नये.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या वेळी म्हणाले, की  मोठय़ा भावाने मोठय़ा भावासारखे वागावे. त्याने लहान भावाच्या ताटातील घेऊ नये. 

जिवात जीव असेपर्यंत आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. प्रकाश शेंडगे म्हणाले की, भुजबळांना निवडणुकीत पाडण्याची भाषा करण्यात येत आहे. असा विचार केला, तर आम्ही सर्व ओबीसी मिळून तुमचे १६० उमेदवार पाडू! राज्य सरकारने मराठा समाजास कुणबी दाखले देणे ताबडतोब बंद करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा >>> ‘ओबीसी आणि आमचे व्यवसाय एकच मग का डावलता?’ मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे

‘ओबीसींचा पक्ष हवा’

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, की जोपर्यंत ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापन होत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही.  आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाची वाटमारी करण्याचे प्रयत्न होत आहेत. मराटा आरक्षणास आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणास धक्का लागता कामा नये. आमदार देवयानी फरांदे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, टी. पी. मुंडे, आमदार राजेश राठोड, संदेश चव्हाण यांची भाषणे यावेळी झाली.

 १३ नोव्हेंबरच्या पत्रास आक्षेप

मराठा समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करण्यासाठी तपासणी करण्याबाबत राज्यशासनाने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य मागासवर्ग आयोगास लिहिलेल्या पत्राच्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपल्या भाषणात आक्षेप घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uproar in obc elgar meeting after dcm name devendra fadnavis taken by ashish deshmukh zws