‘बदला लेना हर बार सही नही होता लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता’.. हे महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो.. याच ओळीवर दिग्दर्शक सुजॉय घोषने ‘बदला’ या चित्रपटाची कथा गुंफली आहे. रहस्य, गूढकथा उत्तमरित्या पडद्यावर साकारण्यासाठी काही दिग्दर्शक प्रसिद्ध असतात. सुजॉय घोष त्यापैकीच एक. ‘बदला’ म्हणजेच सूडाची दमदार कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे आणि या कथेला प्रभावीपणे साकारले आहे तापसी पन्नू आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पिंक’ चित्रपटाप्रमाणेच बिग बी (बादल गुप्ता) यामध्ये वकीलाच्या भूमिकेत आहेत. तापसीला (नैना सेठी) एका खूनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी ते तिला भेटतात. नैना एक पत्नी, एक आई आणि एक प्रसिद्ध बिजनेस व्हुमन असते. जिचे अर्जुन नावाच्या एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असतात. अचानक एके दिवशी अर्जुनचा खून होतो आणि त्याची आरोपी ठरते नैना. या आरोपातून स्वत:ला वाचवण्यासाठी ती नावाजलेले वकील बादल गुप्ता यांना बोलावते. आपल्यासोबत जे काही घडलं हे सर्व बादल यांना सांगतानाच तापसी आणि बिग बी यांच्या दमदार अभिनयाची एक प्रकारे पडद्यावर जुगलबंदीच पाहायला मिळते. उत्तम संवाद, कुशल सिनेमेटोग्राफी आणि सर्वोत्तम दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. तापसी आणि बिग बींसोबतच आणखी एक व्यक्ती या चित्रपटात मन जिंकून जाते, ती म्हणजे अम्रृता सिंग. राणी कौर ही एका आईची भूमिका तिने साकारलेली आहे.

प्रत्येक दृश्यासोबत एक गूढ आणि त्या गूढाची उकल आपल्याला झालीये असं वाटत असतानाच दिग्दर्शकाने कथेला दिलेलं वळण ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरते. या चित्रपटातून तापसी अभिनयाची आणखी एक पायरी वर चढण्यात यशस्वी ठरते. तर बिग बींना महानायक का म्हणतात याची प्रचिती चित्रपटातून क्षणोक्षणी येते. कथेत अम्रृता सिंगची एण्ट्री थोडी खटकते. पण त्यापुढील घडामोडींमुळे ही गोष्ट नगण्य ठरते. शेवटपर्यंत कथेचा वेग उत्तम असून मनाला भिडणारे आणि विचार करायला लावणारे संवाद चारचांद लावतात.

बिग बी, तापसी, अम्रृता सिंग आणि दिग्दर्शक सुजॉय घोष या सर्वांच्या दमदार कामगिरीसाठी चित्रपट संपल्यावर टाळ्यांनी कौतुक करावसं नक्की वाटेल. या चौघांसाठी चित्रपटाला चार स्टार.

स्वाती वेमूल

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badla movie review in marathi