सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. गायिका नेहा कक्कर, अभिनेता आदित्य नारायण, अभिनेता शाहीन शेख आणि इतर कलाकारांपाठोपाठ आता ‘बालक पालक’ या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्न बंधनात अडकली आहे.
शाश्वतीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमकरशी लग्न केले आहे. या लग्न सोहळ्याला चित्रपटसृष्टीमधील काही कलाकरांनी हजेरी लावली असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी शाश्वतीने राजेशसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नात्याची कबूली दिली होती. त्यानंतर ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता शाश्वतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.
शाश्वतीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. चाहूल आणि पक्के शेजारी या मालिका तिच्या लोकप्रिय होत्या. तिने रवी जाधव यांच्या बालक पालक चित्रपटात डॉली ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.