‘विजय दिनानाथ चौहान….’ असं म्हणत खुर्चीवर ऐटीत बसणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा ‘अग्निपथ’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा भाग आहे. १९९० च्या दशकात ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या या चित्रपटात बिंग बींची भूमिका सर्वांच्या मनात कायमचं घर करुन गेली. त्यातही त्यांची ही भूमिका पुन्हा कोणीच साकारु शकत नाही असंच अनेकांचं ठाम मत होतं, जे खरं ठरलं. पण, त्याच्या या चित्रपटाचं कथानक पाहता २०१२ मध्ये त्याच धर्तीवर दिग्दर्शक करण मल्होत्राने पुन्हा एकदा ‘अग्निपथ’ हा चित्रपट नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हृतिक रोशनने या चित्रपटात ‘विजय’ची भूमिका एका नव्या पद्धतीने सादर केली.
अशा या चित्रपटामध्ये नात्यांचा ओलावाही पाहायला मिळाला होता. एक वेगळं कथानक मांडताना दिग्दर्शक करण मल्होत्राने भाऊ- बहिणीचं सुरेख नातं प्रेक्षकांसमोर सादर केलं जे अनेकांना भावलं. या चित्रपटात हृतिकच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कनिका तिवारी म्हणजेच चित्रपटातील ‘शिक्षा’सुद्धा कथानकाचा महत्त्वाचा भाग होती. ‘अभी मुझमे कही..’ या गाण्यातून तिच्या चेहऱ्यावरील निरागस भाव अनेकांच्या मनात तिच्यासाठी घर करुन गेले.
वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’
त्या चित्रपटानंतर कनिका फारशी कोणत्या चित्रपटात किंवा कार्यक्रमांमध्ये दिसलीच नाही. तेव्हापासूनच कनिका नेमकी गेली कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. काहीजणांनी तिच्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला. ‘वीटीफीड’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘अग्निपथ’मध्ये काम करतेवेळी कनिका अवघ्या १५ वर्षांची होती. सध्या सोशल मीडियावर तिचे बरेच फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहेत. कनिकाच्या अदा आणि एकंदर अंदाज पाहता येत्या काळात बॉलिवूडमध्ये ती पुन्हा झळकणार का, हाच प्रश्न आता समोर येत आहे.