कोंकणा सेन शर्मा ही हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री आहे यात काहीच शंका नाही. दिग्दर्शिका, लेखिका आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांची ती मुलगी. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू कोंकणाला घरातच मिळालं. मौसमी चटर्जी आणि अपर्णा सेन या दोघींनी त्यांचं चित्रपट करीअर एकत्रच सुरु केलं होतं. याच अपर्णा सेन यांना कोंकणा सेन शर्मा पाहात आली. तेच संस्कार तिच्यावर झाले.
कोंकणाचे आजोबा सत्यजीत रे यांचे सहकारी
कोंकणाचे आजोबा चिदानंद दासगुप्ता हे सत्यजीत रे यांचे सहकारी होते. कोलकाता फिल्म सोसायटीच्या स्थापनेत त्यांचाही सहभाग होता. त्यांनी जगभरातले चित्रपट पाहिले होते. घरात चित्रकला, शास्त्रीय संगीत, पाश्चिमात्य संगीत, चित्रपट या सगळ्याच कला होत्या. त्याच संस्कारात कोंकणा वाढली. मात्र अभिनेत्री व्हायचं असं डोक्यात नव्हतं. मात्र संस्कार तसे झाल्याने कुठलीही सक्ती नव्हती.. मात्र सेटवर नेहमी जाणं होत असे आणि आईच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आई कसं वागते हे तिने पाहिलं होतं. नकळतपणे कोंकणा या क्षेत्रात आली. वयाच्या चौथ्या वर्षी कोंकणाने ‘इंदिरा’ या सिनेमात भूमिका साकारली होती. मात्र अभिनय करायचा असं काही डोक्यात नव्हतं मात्र कोंकणा ओघानेच अभिनयाकडे वळली. पैसे कमवण्याची महत्वकांक्षा नसल्याने भूमिकांबाबत कोंकणा चोखंदळ राहिली.
डार्क भूमिका जेव्हा साकारली
महाविद्यालयात असताना कोंकणाला सुब्रतो सेन यांचा ‘एक जे आछे कन्या’ हा बंगाली सिनेमा मिळाला. यातली भूमिका डार्क होती. ती भूमिका कोंकणाने केली. त्यावेळी कोंकणाला सिनेमा करुन फार आनंद झाला नव्हता. तसंच कॅमेरा फेस करतानाही अडचणी यायच्या. सिनेमा प्रदर्शित झाला नाही तरीही चालेल असं तिला वाटलं. मात्र सिनेमा प्रदर्शित झाला आणि खूप चांगला चालला. या भूमिकेला काही पुरस्कारही मिळाले. मात्र ऋतुपर्णो घोष यांचा ‘तितली’ सिनेमा तिला मिळाला. यात अपर्णा सेन कोंकणाच्या आईच्या भूमिकेत होती.
२००२ मध्ये मिस्टर अँड मिसेस अय्यर आला. यातल्या अय्यर ब्राह्मण महिलेच्या भूमिकेसाठी कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही. शैव आणि वैष्णव परंपरेचा अभ्यास कोंकणाने केला. त्यानंतर काही वर्कशॉप्सही कोंकणाने केली होती. त्यानंतर या सिनेमात अभिनय केला होता. ज्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खरंतर ही भूमिका कोंकणाला मुळीच करायची नव्हती. आई अपर्णा सेन यांना तिने सांगितलं होतं की तू या भूमिकेसाठी कुठल्यातरी दाक्षिणात्य अभिनेत्रीशी बोल. मला ही भूमिका करायची नाही. मात्र अपर्णा सेन यांनी कोंकणाला अभ्यासासाठी दक्षिणेत पाठवलं. त्यानंतर कोंकणा या अभ्यासात दंगून गेली आणि मिसेस अय्यर या भूमिकेशी आपोआपच एकरुप झाली.
२००५ मध्ये मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘पेज थ्री’ हा हिंदी सिनेमा आला त्यातल्या माधवी शर्माची भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे. यानंतर कोंकणा सेन शर्मा बॉलिवूडमध्ये आली आणि स्थिरावलीही. पेज थ्रीमध्ये तिने पेज थ्री कव्हर करणाऱ्या आणि नंतर क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराची भूमिका साकारली होती. तिच्या हाती काही उच्चभ्रू लोकांच्या बातम्या लागतात त्याचा तिला काय परिणाम भोगावा लागतो? माधवीच्या आयुष्यात तिचा प्रियकर असतो त्याच्याविषयीचं सत्य समजल्यावर तिच्या मनाची काय अवस्था होते? हे सगळं कोंकणाने उत्तम प्रकारे साकारलं आहे. या चित्रपटातल्या अभिनयासाठी कोंकणाला झी सिने अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. २००६ मध्ये ओमकारा आला. या चित्रपटातही कोंकणाची भूमिका खास लक्षात राहण्यासारखी होती. या सिनेमातल्या सह अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड असे चार पुरस्कार मिळाले.
‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘लागा चुनरी मे दाग’, ‘वेक अप सिड’, ‘तलवार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘अजीब दास्ताँ’, ‘राम प्रसाद की तेरवी’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने लिलया भूमिका साकारल्या आहेत. ‘कुत्ते’ आणि द रेपिस्ट या सिनेमांमध्येही काम केलं आहे. स्मिता पाटील, शबाना आझमी, तब्बू यांचा वारसा कोंकणा सेन शर्मा पुढे समर्थपणे चालवते आहे यात शंकाच नाही.
कोंकणाचा जन्म ३ डिसेंबर १९७९ ला कोलकाता या ठिकाणी झाला. २००७ पासून कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी एकमेकांना डेट केलं होतं. ३ सप्टेंबर २०१० या दिवशी कोंकणा आणि रणवीर शौरी यांचं लग्न झालं. कोंकणा आणि रणवीर हे एकमेकांना डेट करत असल्यापासून त्यांच्याविषयी चर्चा सुरु होत्या. मात्र २०१० मध्ये झालेलं या दोघांचं लग्न १० वर्षेच टिकलं. कारण कोंकणा सेनने रणवीर शौरीपासून २०२० मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा आहे. तिचं व्यक्तीगत आयुष्य हे काहीसं वादाचं ठरलं. मात्र अभिनयाच्या क्षेत्रात तिने उत्तम काम केलं आहे.
एखाद्या भूमिकेत शिरुन काम करणं हे कोंकणाला खूप चांगलं जमतं. तिने ते विविध सिनेमांमधून सिद्धही केलं आहे. कोंकणा सेन शर्मा या गुणी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!