बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने पतौडी कुटुंबीय अजूनही चिंतेत आहे. कारण हल्लेखोराने थेट घरात घुसून सैफवर चाकूने हल्ला केला होता. या घटनेमुळे सैफ अली खान आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच अधिक सुरक्षा म्हणून आता करीना कपूर खानने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, करीनाच्या टीमने मंगळवारी मुंबईच्या पापाराझींची भेट घेतली. यामध्ये जेह आणि तैमूर दोघांच्या सुरक्षेचा विचार करता काही नियम आखण्यात आले आहेत. झालेल्या बैठकीत पापाराझींना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हल्ला झाला तेव्हा जेह आणि तैमूर दोन्ही लहान मुलंसुद्धा घरातच होती. त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर करीनाच्या टीमने पापाराझींची भेट घेतली.

पापाराझींना केली विनंती

पापाराझी नेहमी तैमूर आणि जेह दोघांचेही फोटो क्लिक करत असतात. या लहान मुलांचे छोटे छोटे क्षण कॅमेऱ्यात कैद करत ते सोशल मीडियावर शेअर करतात. आजवर जेह आणि तैमूरचे घराबाहेर आणि अन्य विविध ठिकाणी फिरतानाचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यामुळे पापाराझींनी आता जेह आणि तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ काढू नयेत, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

सैफबरोबर त्या दिवशी नेमकं काय घडलं?

सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह घरात होता. त्यावेळी हल्लेखोर त्यांच्या घरात शिरला. घरात आल्यावर तेथील मदतनीसशी त्याचा वाद झाला. दोघांचा आवाज ऐकून सैफ तेथे पोहचला, त्याने हल्लेखोराला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैफवर चाकूने हल्ला करत त्याने तेथून पळ काढला होता. १६ जानेवारीला मुंबईतील वांद्रे येथील सैफच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. सैफवर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर २१ जानेवारीला सैफ पुन्हा घरी परतला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियामार्फत त्याची काळजी व्यक्त केली होती. तसेच सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. सदर घटनेनंतर सैफच्या घराबाहेरील सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor team request to paparazzi do not click picture and video of jeh and taimur after saif ali khan attack rsj