देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेत कॉलेजचा नवीन डीन डॉक्टर विक्रांत म्हणजेच अभिनेता सागर कारंडेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे. विक्रांतने मोनिकाला आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. देवा मोनिकापासून दूर असला तरी पण मोनिका देवाचं प्रेम विसरून विक्रांतचं प्रेम स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे. तिची द्विधा मनस्थिती बघून मोनिकाच्या आईने मोनिकाला ७ दिवसांची मुदत दिली आहे. या ७ दिवसात जर मोनिका देवाला परत मिळवू शकली नाही तर मोनिकाची आई स्वतः तिचा हात विक्रांतच्या हातात देईल. हे ऐकून कबीर देखील अस्वस्थ आहे.
कबीर देवाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. अक्का आणि सत्या या दोघांकडे तो मदत मागतो. आता अक्का आणि संपूर्ण गॅंग कबीर सोबत देवाला शोधून काढून परत आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना देवाला परत आणण्यात यश मिळेल का? देवा परत आल्यावर मोनिकावरील त्याचं प्रेम पुन्हा व्यक्त करेल का? जर देवा परत नाही आला तर मोनिका विक्रांतच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.