रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा वास्तवदर्शी चित्रपट पांढरपेशी समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालण्यास सज्ज आहे. येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. आता लवकरच ‘एक होतं पाणी’ नक्की काय सांगू इच्छित आहे हे कळणार असून या चित्रपटाचा मौलिक संदेश देणारा ट्रेलर प्रशासनाच्या डोळ्यांवरील झापडं उघडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाचा ट्रेलर पाहून अतिशय भावूक होत अभिनेत्री वर्ष उसगांवकर म्हणाल्या, ”पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटांतून होणारं प्रबोधन हे फार गरजेचं आहे.” ‘बोभाटा’, ‘भान राहील’, ‘चला चला’, आणि ‘एक होतं पाणी’ अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत हेते. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून ही चारही गाणी शब्दबद्ध झाली आहेत तर विकास जोशी यांच्या सुरेल संगीताची या गाण्यांना जोड लाभली आहे.

अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या ‘एक होतं पाणी’ ने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्ब्ल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये; ‘विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे

दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट आहे. ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे… प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये… पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण… याचा उहापोह ‘एक होतं पाणी’ करतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek hot pani upcoming marathi movie trailer released