एखाद्या चित्रपटाच्या यशोगाथेमधे इतक्या व अशा गोष्टी असतात की त्यावरून त्या चित्रपटाकडे पुन्हा पाहताना आपला दृष्टिकोन बदलून जावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वास्तव’ (१९९९) चित्रपटही अगदी तसाच.

हे छायाचित्र त्याच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यातील आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर व संजय दत्तसोबत त्यात निर्माता दीपक निकाळजे व संगीतकार जतिन ललित दिसत आहेत. मुंबईत तेव्हा मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘वास्तव’ने रौप्य महोत्सवी आठवड्याचे यश संपादले. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण रामगोपाल वर्माचा ‘मस्त’ व ‘वास्तव’ एकाच दिवशी झळकताना काही ट्रेन्ड पंडिताना ‘मस्त’चे पारडे जड वाटत होते. रामू व उर्मिला मातोंडकर या हिट जोडीच्या अनेक चित्रपटातील एक म्हणून ‘मस्त’ त्याना महत्त्वाचा वाटला. पण चित्रपट गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार आहे हे ‘वास्तव’ समीक्षक व प्रेक्षक या दोघांनाही आवडते. चित्रपट तसा अंडरवर्ल्डवरचाच. एक मध्यमवर्गीय युवक योगायोगातून कसा गँगस्टर बनतो हे मध्यवर्ती कथासूत्र. पण तेवढ्यावरच हा चित्रपट थांबत नाही हेच ‘वास्तव’चे वेगळेपण व मोठीच ताकद. या गॅगस्टरला (अर्थात संजय दत्त) एक शरीरविक्रय करणारी युवती ( नम्रता शिरोडकर) भावनिक मानसिक साथ देते. तर त्याच्या आईला (रिमा लागू) मात्र आपल्या मुलाचे हे एकूणच वागणे मान्य नसते. आपण असे संस्कार त्याच्यावर केले नव्हते ही तिची तळमळ व अस्वस्थता.. अखेर तीच अतिशय कठोर निर्णय घेत आपल्या मुलावर गोळ्या झाडते. या क्लायमॅक्सने चित्रपटाला अगदी वेगळ्याच उंचीवर नेले. येथे महेश मांजरेकरमधील अतिशय संवेदनशील दिग्दर्शक दिसतो असे म्हणावे अशी चित्रपटात यासह बरीच दृश्ये होती. पण त्याच्यातील धाडसी माणूसही दिसतोय अशा पध्दतीनेच तो अंडरवर्ल्डमधील ‘वास्तव’ला चित्रपटात थेट भिडला होता. या सार्‍यातून चित्रपट वेगळा ठरतानाच प्रेक्षकांनाही भिडला. तेच तर महत्त्वाचे असते व महेश मांजरेकरने नेहमीच याला प्राधान्य दिले. महेशच्या दिग्दर्शनीय वाटचालीतील हा खूपच महत्त्वाचा चित्रपट. ‘आई’, ‘निदान’ व ‘अस्तित्व’ या चित्रपटानंतर हिंदीत खूप मोठी झेप घ्यायची महेशची जिद्द या चित्रपटाने यशस्वी ठरली हे मोठेच ‘वास्तव’. तो संजय दत्तसोबत याच चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आला ही तर तेव्हाची मोठीच बातमी होती. नायिकेच्या भूमिकेसाठी सुरुवातीस जुही चावलाची निवड झाली होती. पण त्या व्यक्तिरेखेत असणारे काही संवाद व शिव्या आपल्या इमेजला शोभणार नाहीत असे मानत तिने चित्रपट सोडला. नम्रता शिरोडकरने मात्र आपण अशी व्यक्तिरेखा साकारतोय हा अभिनयाचा भाग मानले. या चित्रपटाच्या यशावर तिच्या मुलाखतीचा योग आला असता तिनेच हे सांगितले. चित्रपटाला ‘वास्तव’ टच यावा म्हणून महेशने वर्सोव्यातील भर वस्तीत चित्रीकरण केले व तेथे सेटवर आम्हा सिनेपत्रकारानाही बोलावले.

… अंडरवर्ल्डवर चित्रपट म्हटल्यावर ‘हत्यार’, ‘सत्त्या’, ‘कंपनी’ अशाच काही चित्रपटांसह ‘वास्तव’ही आठवतो पण तेवढ्यावरच ते थांबत नाही तर त्याच्या थीमनुसार पोस्टरपासून त्यातील रिमाने साकारलेली करारी आई हेदेखील समोर येते. हेच या चित्रपटाचे खूप मोठे ‘वास्तव’ यश आहे. महेश मांजरेकरला दिग्दर्शक म्हणूनही या चित्रपटाने ओळख व प्रतिष्ठा दिली हेही एक ‘वास्तव’. संजय दत्तच्या कारकीर्दीला सावरण्यात याच यशाची साथ राहिलीय हेदेखील ‘वास्तव’…
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback success vaastav