‘वजनदार’, राज्य पुरस्कारप्राप्त ‘रेडू’, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘रिंगण’, ‘गच्ची’ असे एकापेक्षा एक विषय असलेले चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ हा चित्रपट येत्या २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि मुलगी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागातील या दोन लहानग्यांच्या मैत्रीवर हा चित्रपट बेतला असल्याचा अंदाज ‘पिप्सी’चा पोस्टर पाहताना येतो. यावर्षीच्या राज्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष मोहोर उमटवणारा हा चित्रपट येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्येही ते आपणास दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात लहान मुलांची निरागसता टिपण्यात आली असून, वास्तविक आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींमधून त्यांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे.

वाचा : गोवा मराठी चित्रपट महोत्सवात माधुरीची ‘बकेट लिस्ट’

दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा सिनेमा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.ई या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली होती. तसेच आगामी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीदेखील ‘पिप्सी’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी महोत्सवात आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बाल आणि तरुण वर्गासाठी देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या यादीतही ‘पिप्सी’ चित्रपटाने स्थान मिळवले आहे. अशाप्रकारे एक हटके विषय घेऊन सर्वत्र आपली मोहर उमटवणारा हा चित्रपट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील ‘पिप्सी..अ बॉटल फूल ऑफ होप’ असं म्हणत आपलंसं करण्यास लवकरच येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie pipsi maithili patwardhan sahil joshi child artists in lead role