अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या लग्नापासूनच सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यांविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. अभिनेत्री दीपिका पदुकोण- रणवीर सिंगपासून ते अगदी सोनम कपूर- आनंद अहूजार्यंत प्रत्येक सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे श्वेता त्रिपाठी. ‘मसान’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनामनात घर करुन गेलेली श्वेता तिचा प्रियकर चैतन्य शर्मा उर्फ रॅपर ‘स्लोचीता’ याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ जूनला या दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी श्वेता आणि चैतन्यच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. विमानप्रवासादरम्यान त्यांच्यात हे प्रेमाचं नातं खुललं होतं. खुद्द श्वेतानेच ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. काही कामानिमित्त आम्ही मुंबईहून दिल्लीला गेलो होते. प्रवासादरम्यान दिल्लीला जातेवेळी आम्ही काहीच बोललो नव्हतो. पण, येताना मात्र आम्ही एकमेकांसोबतच विमानात बसलो. पहाटे पाच वाजताचं फ्लाइट असूनही आमच्या गप्पा काही केल्या संपण्याचं नाव घेत नव्हत्या.

रंगभूमीशी या दोघांचंही खास नातं आहे. चैतन्यने एका परफॉर्मिंग क्लबमध्येच श्वेताला लग्नासाठी विचारलं होतं.  आपल्याकडे एक नवं नाटक असल्याचं सांगत त्याने श्वेताला क्लबमध्ये बोलावलं आणि प्रपोज करत तिला सुखद धक्काच दिला होता. श्वेता आणि चैतन्यची ही अनोखी प्रेमकहाणी सध्या चाहत्यांमध्येही आकर्षणाचा विषय ठरत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यामध्ये अत्यंत खासगी समारंभात हे दोघं आपल्या नात्याची नवी सुरुवात करणार आहेत. चित्रपटसृष्टीत श्वेताने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यासोबतच ती वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. दहा वर्षांपूर्वी रंगभूमीवर असणाऱ्या प्रेमापोटी मुंबईची वाट धरलेल्या श्वेताने बऱ्याच जाहीराती आणि लघुपटांमध्येही काम केलं आहे. ‘मसान’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली असून, चौकटीबाहेरच्या भूमिका करण्याकडेच तिचा जास्त कल दिसून येतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masaan fame bollywood actress actress shweta tripathi to marry chaitnya sharma