ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. १९७५ साली ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकात त्यांनी ‘लाल्या’ची भूमिका निभावली होती. सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरील मालिकांच्या माध्यमातून भाटकर यांचा चेहरा घराघरामध्ये पोहचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले. १९९० ते २००० सालामध्ये त्यांनी अनेक मालिकांमधून अजरामर भूमिका साकारल्या. दूर्दशनवर १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो इन्सपॅक्टर’ आणि ‘दामिनी’ या दोन मालिकांमधील भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर झी टिव्हीवरील ‘कमांडर’ आणि ‘डीडी टू’वरील तिसरा डोळा या मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी ते आजही ओळखले जातात. यानंतरही ते ‘हद्दपार’, ‘बंदिनी’, ‘युगंधर’ या मालिकांमधूनही भाटकर छोट्या पडद्यावर दिसले. याशिवाय बी. पी. सिंग यांच्या सिर्फ ‘चार दिन’ या छोट्या टेलीफिल्ममध्येही रमेश यांनी काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता.

आपल्या कारकिर्दीमध्ये ३० मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांचे एकूण हजारहून अधिक भाग प्रदर्शित झाले आहेत. १९९० च्या दशकामध्ये रामेश भाटकर हे खऱ्या अर्थाने या टिव्हीवरील हिरो होते. गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये भाटकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. वयाची सत्तरी गाठली तरी त्यांचा कामाचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने चिरतरुण अभिनेता गमावाल्याची भावना व्यक्त होतं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorable tv serials of marathi actor ramesh bhatkar