देशावर असलेलं करोनाच संकट हे कमी होत असल्याचं चित्र काही दिसत नाही. करोना संक्रमित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत असली तरी मृतांची संख्या ही अजूनही कमी झालेली नाही. पण काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. याचा फटका चित्रपटसृष्टीला देखील बसला. अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यामुळे कलाकारांना काम मिळणे बंद झाले. अशातच काही कलाकारांवर आर्थिक संकटदेखील कोसळले. असेच काहीसे अभिनेता निर्भय वाधवासोबत झाले आहे.
छोट्या पडद्यावरील ‘हनुमान’ म्हणजेच निर्भय वाधवा गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगार आहे. त्याच्यावर आर्थिक संकट कोसळ्यामुळे त्याने त्याची बाईक विकली आहे. नुकताच निर्भयने ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. ‘गेल्या दीड वर्षांपासून घरात असल्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या. लॉकडाउनमुळे माझी संपूर्ण सेविंग संपली. माझ्याकडे काम नव्हते. लाइव्ह शो देखील होत नव्हते. काही पैसे मिळणे बाकी होते पण ते देखील मिळाले नाहीत’ असे निर्भय म्हणाला.
आणखी वाचा : ‘आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’, कमल हासन यांच्या मुलीवर कोसळलं आर्थिक संकट
दरम्यान, निर्भयने त्याच्याकडे एक सुपर बाईक असल्याचे सांगितले. पण लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याला ती विकावी लागली. ‘माझी बाईक जयपूर येथील घरी होती. पण खर्च चालवण्यासाठी मी बाईक विकायचा मोठा निर्णय घेतला. ही बाईक विकणे माझ्यासाठी फार कठीण होते कारण ती खूप महागडी बाईक होती’ असे निर्भय म्हणाला.
निर्भयने ती बाईक २२ लाख रुपये देऊन खरेदी केली होती. त्यामुळे ती विकताना थोडे कठीण झाले होते. पण अखेर कंपनीलाच ती बाईक साडेनऊ लाख रुपयांमध्ये विकावी लागली. या बाईकशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या होत्या असे निर्भय म्हणाला. निर्भयने ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत हनुमान हे पात्र साकारले आहे.