‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या महिपता अटक झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी त्याला शिक्षा करण्यात आली आहे. महिपत कट रचून अर्जुनच्या वडिलांच्या औषधांच्या कंपनीत ड्रग्ज ठेवतो. यानंतर प्रताप सुभेदारांना पोलिसांकडून अटक करण्यात येते. परंतु, सायली आणि अर्जुन हुशारीने सगळे पुरावे शोधून काढतात आणि महिपतला कोर्टात दोषी सिद्ध करतात.
सायलीची हुशारी पाहून कल्पना आणि प्रतापला लाडक्या सुनेचा अभिमान वाटतो. घरी आल्यावर सर्वत्र अर्जुन-सायलीचं कौतुक सुरू असतं. परंतु, प्रताप सुभेदारांना झालेल्या अटकेमुळे बाप-लेकाच्या नात्यात दुरावा आलेला असतो. हा दुरावा कमी करण्यासाठी सायली पुढाकार घेते. ती सासऱ्यांना समजावून “अर्जुनशी एकदा बोलून तर बघा” असा सल्ला देते.
हेही वाचा : तितीक्षा तावडे, पूजा सावंत पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
सायलीच्या सल्ल्यानुसार प्रताप सुभेदार अर्जुनशी बोलायला जातात आणि लाडक्या लेकाची माफी मागतात. दु:ख व्यक्त करून शेवटी ते अर्जुनची घडल्या प्रकाराबद्दल माफी मागतात तसेच यापुढे तुझ्यावर अविश्वास दाखवण्याची चूक पुन्हा होणार नाही असंही सांगतात. वडिलांना पाहून अर्जुन प्रचंड भावुक होतो आणि त्यांना मिठी मारून रडू लागतो. बापलेकामधील दुरावा कमी झाल्याने सगळे कुटुंबीय आनंदी होतात.
आता प्रेक्षकांना पुढच्या भागात सायली-अर्जुनमधील मैत्रीचं नातं आणखी घट्ट होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. कोणतंही नातं नसताना आपल्या घरच्यांना एवढी मदत केल्यामुळे अर्जुन सायलीचे आभार मानणार आहे. आता या दोघांमधलं प्रेम कसं फुलणार आणि भविष्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार हा सीक्वेन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.