मुंबई : यंदा गणेशोत्सवात नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन तलाव स्थळांवरून सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आले. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. तसेच विसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रीक टन घन कचरा संकलित करण्यात आला.

गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनानंतर गिरगाव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ, गोराई चौपाटी, तसेच इतरत्र विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अनंत चतुर्दशीला संपूर्ण दिवस आणि रात्र, तसेच आणि बुधवारी संपूर्ण दिवसभर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अथक, अखंड कार्यरत राहून स्वच्छता मोहीम राबवली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे सात हजार कामगार, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मदतीने केलेल्या स्वच्छतेतून एकूण ३६३ मेट्रिक टन घनकचरा संकलित करण्यात आला. चौपाट्यांवर दररोज सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे परिसर, तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातही स्वच्छता करण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला

महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी बुधवारी विविध चौपाटींना भेट देऊन स्वच्छताविषयक कार्यवाहीची पाहणी केली. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

खाद्यपदार्थांचे वेष्टण, पाण्याच्या बाटल्यांचा खच

चौपाट्यांवरील विशेष स्वच्छता मोहिमेत खाद्यपदार्थांचे वेष्टण (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या यांसह पादत्राणे आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे, तसेच निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

हेही वाचा – एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाची दुसरी फेरी २६ सप्टेंबरपासून

५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठी ५०० हून अधिक निर्माल्य कलश आणि ३५० निर्माल्य वाहक वाहने, ६ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. यंदा गणेशोत्सवामध्ये सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलन झाले आहे. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमधील विविध ३७ सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य नेण्यात आले. साधारणपणे एका महिन्यात या निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. हे खत महानगरपालिका उद्यानांमध्ये वापरण्यात येईल, असे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.