मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर आता शासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ४०,००० रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेत, शासनाने सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदाराकडून ४०,००० रुपयांची लाच आणि एक लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर आता शासनाने त्यांच्यावर कारवाई करत सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित केले आहे.

सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वी सुजाता पाटील यांनी एका प्रकरणासाठी एक लाखाची मागणी केल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. यातील ४० हजार रुपये घेताना सुजाता पाटील यांना एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.

जोगेश्‍वरी येथील एका तक्रारदाराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर दिला होता. पाच ऑक्टोबर रोजी तो गाळा त्यांनी भाडेकरुकडून ताब्यात घेतला होता. मात्र भाडेकरु महिलेसह इतरांनी गाळ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. याबाबत त्यांनी जोगेश्‍वरी पोलिसांत भाडेकरुविरुद्ध तक्रार केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती. गाळ्याचा ताबा घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती अशी माहिती समोर आली होती. त्यापैकी दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते. उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या. त्यामुळे तक्रारदाराने सुजाता पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर सुजाता पाटील यांची विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर न्यायालयाने सुजाता पाटील यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सुजाता पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडत हे प्रकरण फ्रॅब्रिकेटेड असल्याचे म्हटले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant commissioner of police sujata patil suspended from service abn