घोटाळ्याची माहिती दडवून कंत्राटदाराला पाठीशी घातल्याचा ठपका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णालयासाठी खरेदी केलेल्या यंत्रांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याची माहिती दडवून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रताप पालिकेतील तपास यंत्रणा असेलेल्या ‘चाचणी, लेखा व दक्षता अधिकारी’ विभागाने (टाओ) केल्याचे उघडकीस आले आहे. कुंपणानेच शेत खावे, असा प्रकार करणाऱ्या ‘टाओ’च्या प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांची र्सवकष चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. ‘टाओ’च संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याने पालिकेत गोंधळ उडाला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयासाठी इंग्लंडमधून ५१ इंटिग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया यंत्र खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने २०१३-१४ मध्ये घेतला होता. निविदा प्रक्रियेअंती हे काम देण्यात आलेल्या कंत्राटदाराने रुग्णालयांमध्ये पुरविलेल्या ५१ पैकी केवळ २० यंत्रांची आयातविषयक कागदपत्रे पालिकेला सादर केली. मात्र, ३१ यंत्रे परदेशातून आयात केल्याचा पुरावा पालिकेला सादर केलाच नाही. याबाबत पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर ‘टाओ’ने या प्रकरणाची चौकशी केली.

‘टाओ’ने केलेल्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे पालिकेचे उपायुक्त (परिमंडळ-३) वसंत प्रभू आणि कर निर्धारक व संकलक बापू पवार यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. ‘टाओ’ने या प्रकरणाची एकतर्फी चौकशी करीत कंत्राटदाराला पाठीशी घातल्याचा ठपका चौकशी समितीने अलिकडेच प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात ठेवला आहे. ‘टाओ’ने केवळ तक्रारदार अधिकाऱ्यांची मते नोंदवून घेतली. मात्र ज्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार होती, त्यांचे मत अथवा निवेदन न नोंदविताच एकतर्फी चौकशी केली. उलट मध्यवर्ती खरेदी खात्याबाबतच असंतोष असल्याचे चित्र ‘टाओ’ने आपल्या अहवालात निर्माण केले, असे समितीने म्हटले आहे.

चौकशी समितीने नोंदवलेली निरीक्षणे

  • कंत्राटदाराने पुरवठा केलेली यंत्रे मे. मेडिकल इंटरनॅशनल इंग्लंड लि. या कंपनीने उत्पादित केली आहेत का, याबाबत चौकशी करताना ‘टाओ’ने एअर इंडिया, कस्टम आदी यंत्रणांकडून माहिती न घेता केवळ कंत्राटदाराचे निवेदन नोंदवून घेत त्याच्या त्रुटी आणि बनावटगिरीवर पांघरूण घातले, असा आक्षेप चौकशी समितीने नोंदवला आहे.
  • परदेशातून आयात केलेल्या दोन यंत्रांची विमानाची बिले, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, खरेदी पावतीची मूळ प्रत, विमा प्रमाणपत्र, बिल ऑफ लॅण्डिंग, बिल ऑफ एन्ट्री, कस्टमचे ‘ना हरकत’, वैद्यकीय उपकरणांच्या आयातीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे तपासून ‘टाओ’ने आपला अहवाल तयार केला नाही. केवळ कंत्राटदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करून ‘टाओ’ने तो प्रशासनाला सादर केला.
  • तीन उपकरणांची विक्री व खरेदी करणाऱ्यांबाबत ‘झाऊबा’ या संकेतस्थळावर माहिती नसते, असे ‘टाओ’ने अहवालात म्हटले होते. या संकेतस्थलावर ही माहिती उपलब्ध असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे वस्तुस्थिती दडवून ठेवल्याचा ठपका ठेवत ‘टाओ’ प्रमाखांसह संबंधित अधिकाऱ्यांवर र्सवकष चौकशीअंती कठोर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc inquiry committee observations report about hospital scams