मुंबई : शहर आणि उपनगरांतील हवामान व पावसाची अचूक माहिती मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने आणखी ६० ठिकाणी स्वयंचलित हवामानदर्शक संयंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या ६० ठिकाणी हवामान संयंत्रे कार्यरत असून त्यात आणखी ६० संयंत्रांची भर पडणार आहे. नॅशनल सेन्टर फॉर कोस्टल रिसर्चने (एनसीसीआर) केलेल्या शिफारशीनुसार ही अतिरिक्त स्वयंचलित हवामानदर्शक संयंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला मुंबईतील प्रत्येक विभागातील हवामानाची अचूक माहिती मिळू शकणार आहे. यासाठी महानगरपालिकेला १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईत मार्चमध्ये १२ हजारांहून अधिक घरांची विक्री ; घर विक्रीतून सरकारला मिळाला १,१३७ कोटी रुपये महसूल

मुंबईत हवामान विभागाने केवळ कुलाबा आणि सांताक्रूझ परिसरात हवामानदर्शक संयंत्रे बसविली आहेत. मात्र गेल्या काही कालावधीत महानगरपालिकेने तब्बल ६० ठिकाणी अशी स्वयंचलित संयंत्रे बसविली आहेत. या संयंत्रांमुळे मुंबईतील त्या-त्या ठिकाणचे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, हवेचा वेग, वाऱ्याची दिशा असे हवामानाचे २८ मापदंड व त्यांची अचूक मोजणी उपलब्ध होत आहे. दर १५ मिनिटांनी ही माहिती महानगरपालिकेच्या मुख्य सर्वरवर उपलब्ध होते. पावसाळ्यात कधीकधी उपनगरात खूप पाऊस पडतो, पण शहर भागात ऊन पडलेले असते. त्यामुळे पावसाळ्यात उपनगरातील एखाद्या व्यक्तीला कामानिमित्त शहरात यायचे असेल तर त्याला पावसाचा अंदाज मिळू शकेल. आता ही यंत्रणा अजून बळकट होणार आहे. पावसाचे अचूक मोजमाप व एकात्मिक पूर अंदाज क्षमता वाढवण्यासाठी ‘एनसीसीआर’ने मुंबईत अतिरिक्त ९७ ठिकाणी स्वयंचलित हवामानदर्शक संयंत्रे बसवण्याची शिफारस केली होती. मात्र यापैकी ३७ ठिकाणी ही यंत्रणा बसविणे शक्य नाही. यापैकी काही ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ९७ पैकी ६० अतिरिक्त ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या कामासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या असून ही ६० संयंत्रे बसविण्यासाठी १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.  महानगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात २.६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to set up automatic weather stations at 60 more places mumbai print news zws