|| रसिका मुळ्ये

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय, राज्य स्पर्धा आणि विविध प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना माफक शुल्कात घेता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राला निष्क्रियतेचा फटका बसतो आहे. या केंद्राकरिता विद्यापीठाने तरतूद केलेल्या रकमेपैकी ८० टक्के निधी पडून आहे. त्यामुळे हे स्पर्धा परीक्षा केंद्र हे नावापुरतेच राहिले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, विविध प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने केंद्र स्थापन केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शिकवण्या या माध्यमांतून बाहेर कोटय़वधी रुपयांची उलाढाल आणि स्पर्धा असताना विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रशिक्षण घेता यावे या उद्देशाने हे केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानुसार या केंद्रात अडीच ते तीन हजार रुपये शुल्क घेतले जाते. या केंद्रात सध्या ७० विद्यार्थी मार्गदर्शन घेत असून दरवर्षी या केंद्रासाठी विद्यापीठ लाखो रुपयांची तरतूद करते. एकीकडे चांगले मार्गदर्शक नाहीत, ग्रंथालयात हवी ती पुस्तके उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी विद्यार्थी करत असताना दुसरीकडे केलेल्या तरतुदीमधील बहुतांशी निधी पडून असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी या केंद्रासाठी १६ लाख ७२ हजार २०० रुपये आवर्ती तरतूद करण्यात आली होती. त्यातील ३ लाख ४६ हजार ८० रुपये इतकीच रक्कम ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च झाले. तसेच ४ लाख रुपयांच्या अनावर्ती तरतुदीपैकी ३ लाख २ हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यापूर्वीही करण्यात आलेल्या तरतुदींपैकी बहुतांशी रक्कम खर्च करण्यात आली नाही, अशी माहिती अधिसभेच्या सदस्यांनी दिली. विद्यापीठाच्या निष्क्रियतेचा परिणाम केंद्राच्या कामावर होतो आहे.

‘विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळणे अपेक्षित आहे. मुंबईतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहे, मात्र मुंबई विद्यापीठ याकडे काणाडोळा करत आहे. केंद्रसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असूनही प्रत्यक्षात ते खर्च होत नाहीत आणि जो काही खर्च होतो, त्याचा परिणामही दिसत नाही.’    – मिलिंद साटम, मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition exam