मंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतरही सरकारी सुविधांचा उपभोग घेणाऱ्या आणि लाखो रुपयांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तब्बल नऊ माजी मंत्र्यांच्या मालमत्तेवर टाच आणून ही थकबाकी वसूल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यानुसार टेलिफोन बिलाची थकबाकी त्वरित भरा अन्यथा सक्तीच्या वसुलीच्या कारवाईला सामोरे जा, अशी नोटीस या माजी मंत्र्यांना सामान्य प्रशासन विभागाने धाडली आहे.
सन १९९८ ते ९५ दरम्यानच्या काळात मंत्रीपद गेल्यानंतरही सरकारी बंगल्यात राहून सुविधांचा लाभ घेणाऱ्या मात्र थकबाकी न भरणाऱ्या या माजी मंत्र्यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन. एम. कांबळे, बी. ए. देसाई, चंद्रिका केनिया- जैन, अशोकराव पाटील, पंडितराव दौंड, सुबोध सावजी, श्रावण पराते, विद्या बेलोसे, सतीश पेडणेकर, डॉ. राजेंद्र गोडे यांचा समावेश असून त्यापैकी पेडणेकर आणि गोडे यांचे अलिकडेच निधन झाल्यामुळे कारवाईच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
नियमानुसार मंत्रिपद गेल्यानंतर १५ दिवस त्या मंत्र्याला सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र त्यानंतर त्याला सरकारी नियमाप्रमाणे भाडे द्यावे लागते, तसेच टेलिफोन, वीजबिलेही भरावी लागतात. मात्र या मंत्र्यांनी मंत्रिपद गेल्यावर अनेक महिने सरकारी बंगला आणि तेथील सुविधांचा लाभ घेतला, मात्र त्यांची रक्कम सरकारकडे जमा केलेली नाही.
कॅगने सन २००९च्या आपल्या अहवालात ही गंभीर बाब उघडकीस आणतानाच सरकारने का वसुली केली नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर या मंत्र्यांच्या पेन्शनमधून ही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अशी तरतूद नसल्याचा मुद्दा संसदीय कार्य विभागाने उपस्थित केल्याने तो मार्गही बंद झाला. त्यामुळे मंत्रालयातून पाठविण्यात येणाऱ्या मागणी पत्रांना संबधित मंत्र्यांनी आजवर केराच्या टोपल्याच दाखविल्या एवढेच नव्हे तर आपण ज्या बंगल्यात राहत होतो तो आपल्या नावावर नव्हता आणि टेलिफोनचे बिलही आपल्या नावावर नव्हते, मग ते का भरावे असा प्रतिप्रश्न काही मंत्र्यांनी विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल वसुली अधिनियम १९७६च्या कलम १७ नुसार या माजी मंत्र्यांच्या मालमत्तेवर टाच आणून ही वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थकबाकीदार मंत्री
डॉ. राजेंद्र गोडे -३.१८ लाख,
एन एम कांबळे- १८ हजार ३९७,
सतीश पेडणेकर – १८हजार २६,
बाळासाहेब जाधव -३९ हजार ७६८,
चंद्रिका केनिया-जैन-२ लाख ४१,२७२,
अशोकराव पाटील ८८ हजार ९८६,
पंडितराव दौंड- ३६ हजार ५१६,
बी. ए. देसाई- ४३ हजार २४१,
राजेंद्र गोडे- ३ लाख ८ हजार ११६,
सुबोध सावजी- ५७ हजार ७९३,
श्रावण पराते- ६०हजार ६१,
विद्या बेलोसे-महिने २४ हजार १५६
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2014 रोजी प्रकाशित
नऊ माजी मंत्र्यांच्या मालमत्तेवर टाच?
मंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतरही सरकारी सुविधांचा उपभोग घेणाऱ्या आणि लाखो रुपयांची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तब्बल नऊ माजी मंत्र्यांच्या मालमत्तेवर टाच आणून ही थकबाकी वसूल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-05-2014 at 07:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dues collection from nine former ministers asset