मुंबई : बँक फसवणूक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच ७९ कोटी ७८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या मालमत्ता नवी मुंबई, मुंबई, सातारा, रायगड आणि डेहराडून, हरिद्वार, पौरी गढवाल (उत्तराखंड) येथील असून त्यात सदनिका,भूखंड, हॉटेल आणि शेत जमिनींचा समावेश आहे. शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेड (एसबीएमएल) या फार्मा कंपनीविरोधातील २२० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणातील एकूण टाच मालमत्तेचा आकडा ९६ कोटी २० लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे, असे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोहन प्रसाद काला, सविता सतीश गौडा, ललित शंभू मिश्रा आणि इतरांविरोधात  दाखल केलेल्या तक्रारीवरून ईडी याप्रकरणी तपास करत आहे. सीबीआयने आरोपींवर बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडने बँकांचे सुमारे २२० कोटी रुपयांचे नुकसान केले आहे, असा आरोप आहे. एसबीएमएल  औषध घटकांचे उत्पादन करते.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी बनावट कागदपत्रे व खोट्या करारांद्वारे बँकांकडून विविध कर्ज घेतले. एसबीएमएलने बँकांच्या क्रेडिट सुविधांचा गैरवापर करून त्या निधीचा अपहार केला.  त्याचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला, असा आरोप आहे. याप्रकरणात बनावट विक्री आणि खरेदी करून उलाढालीचा आकडा वाढवण्यासाठी अनेक बनावट कंपन्यांचे जाळे तयार करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीने बँकांकडून कर्ज घेतले. कर्ज मिळाल्यानंतर निधी अनेक बनावट कंपन्यांमार्फत वळवला गेला. या कंपन्या एसबीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या किंवा प्रमुख व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावावर तयार केल्या होत्या आणि त्यांचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed attached assets worth rs 79 crore in a bank fraud case mumbai print news zws