काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या धर्तीवर मुंबई काँगेसने गांधी जयंतीच्या दिवशी, रविवारी, २ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘नफरत छोडो, भारत जोडो’यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत आरे संवर्धन गटानेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती मैदानापासून मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यादरम्यान काढण्यात येणाऱ्या यात्रेत पर्यावरणप्रेमीही सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर रविवारी आरे, पिकनिक पॉईंट येथेही आंदोलन करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- म्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द

शिंदे-फडणवीस सरकारने कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ ची कारशेड कांजुरमार्ग येथून हलवून पुन्हा आरे जंगलात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील स्थगिती उठवून कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमी, आरेवासीयांचा विरोध डावलून सुरू असलेल्या या कामाविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे आंदोलनही करण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस यांनी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर दर रविवारी आरेमधील पिकनिक पॉइंट येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता पिकनिक पॉईंट येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या १४ आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे.

हेही वाचा- Firing in Mumbai: मुंबई हादरली! कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू

आरेतील पिकनिक पॉइंट आणि दक्षिण मुंबईत आरे वाचवा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आरे संवर्धन गटाच्या सदस्या अमृता भट्टाचार्य यांनी दिली. गांधी जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित भारत जोडो यात्रेत आम्ही आरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अरावली, हसदेव या ठिकाणी सुरू असलेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याच्या मागणीसाठी सहभागी होणार आहोत. विकासाच्या नावाखाली जंगल, वन यांचे नुकसान करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही या यात्रेत सहभागी होणार आहोत, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. तसेच पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment lovers will protest tomorrow from august kranti maidan to mantralaya for save aare forest mumbai print news dpj
First published on: 01-10-2022 at 14:39 IST