मुंबई: मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या घरभाडय़ात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत केली. अमिन पटेल व अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. पालिकेत २७ हजार ९०० सफाई कामगार असून त्यापैकी ५ हजार ५९२ सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. या घरांचे संरचनात्मक परीक्षण केल्यानंतर या इमारती धोकादायक असून  त्या ठिकाणी हे सफाई कामगार राहू शकत नाहीत, अशी बाब समोर आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे ४६ वसाहतींपैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून १२ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मात्र या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी १४ हजार विस्थापन भत्ता आणि ६ हजार रुपये घरभाडे, असे २० हजार रुपये महिना देण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र २० हजार रुपयांमध्ये भाडय़ाची खोली मिळत नसल्याने या रकमेत वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर पाच हजार  रुपये वाढ देण्याची घोषणा सामंत यांनी केली.

सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे २४ ते ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेने ठरविले आहे. तसेच सफाई कामगारांसाठी सरकारने लाड- पागे समितीच्या सर्व शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची  पालिकांनी काटेकोरणे अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in house rent of mumbai municipal corporation cleaners mumbai print news ysh