मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस (आयएल अँड एफएस) गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील ईडी कार्यालयासह राज्यातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करून या कारवाईचा निषेध केला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावून सोमवारी (ता.२२) चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार दुपारी १२ च्या सुमारास पाटील ईडी कार्यालयात दाखल झाले. आपण चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली. ‘ईडीचे समन्स आल्यापासून माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि राज्यभरातील इतर मित्र पक्षांचे दूरध्वनी येत आहेत. आज राज्यभरातून लोक ईडीच्या कार्यालयात येत आहेत. माझी विनंती आहे की कोणीही मुंबईत येऊ नये. या चौकशीत मी ईडीला पूर्ण सहकार्य करेन,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या आवाहनानंतरही बेलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही चौकशी राजकीय सूडापोटी केली जात असल्याचे आरोप करत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. 

प्रकरण काय?

आयएल अँड एफएसने कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. कंपनीने २०१८ मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. याप्रकरणी ईडीने आयएल अँड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर गेल्या आठवडय़ात शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे चौकशी सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil questioned by ed ncp protests across state including mumbai ysh