महाराष्ट्राला लाभलेली वक्तृत्वाची देदीप्यमान परंपरा जोपासण्यासाठी केवळ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यापर्यंत न थांबता ‘लोकसत्ता’ने या स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेऱ्यांमधून महाअंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या नऊ वक्त्यांसाठी आज शुक्रवारी खास वक्तृत्व कार्यशाळा आयोजित केली आहे. महाअंतिम फेरीच्या आदल्या दिवशी होणाऱ्या या कार्यशाळेत वक्तृत्वाच्या विविध अंगांची ओळख या नऊ वक्त्यांना करून देण्यासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, सूत्रसंचालिका व निवेदिका धनश्री लेले आणि अभिनेता व कवी किशोर कदम उपस्थित राहणार आहेत.
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत राज्यातील आठ विभागांतून सवरेत्कृष्ट ठरलेल्या वक्त्यांची निवड झाली आहे. नागपूर विभागात प्राथमिक फेरीतच १५०हून अधिक स्पर्धक असल्याने या विभागातून दोन वक्त्यांची निवड महाअंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. मात्र वक्तृत्वाचा हा जागर स्पर्धेपुरता मर्यादित राहू नये, या स्पर्धेच्या प्रक्रियेतून राज्यातील सवरेत्कृष्ट वक्त्यांना स्पर्धेच्या विविध अंगांची ओळख व्हावी, यासाठी ‘लोकसत्ता’ने या नऊ वक्त्यांसाठी खास कार्यशाळा आयोजित केली आहे. या स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल्स यांचीही मदत मिळाली आहे.
एक्स्प्रेस टॉवरच्या सभागृहात शुक्रवार सकाळपासून होणाऱ्या या कार्यशाळेत विषयाची पूर्वतयारी कशी करावी, याबाबत धनश्री लेले मार्गदर्शन करणार आहेत.
 यात त्या उत्स्फूर्त भाषण याबाबतही मार्गदर्शन करतील. औरंगाबाद येथे आपल्या महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा गाजवणारे आणि सध्या मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी स्पर्धेदरम्यान विषयाचे सादरीकरण कसे करावे, याबाबत स्पर्धकांशी संवाद साधतील. आपल्या काव्यवाचनाच्या अनोख्या शैलीने रसिकांना आपलेसे करणारे कवी सौमित्र अर्थातच किशोर कदम सादरीकरणातील कौशल्ये स्पर्धकांना सांगणार आहेत.
दरम्यान, शनिवारी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात होणाऱ्या महाअंतिम फेरीदरम्यान रुईया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळणारे आणि वक्तृत्वापासून नाटकांपर्यंत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत मोलाची कामगिरी बजावणारे विजय तापस आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे परीक्षक म्हणून लाभले आहेत. शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या या महाअंतिम फेरीनंतर महाराष्ट्रातील ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ कोण, ही उत्सुकता संपणार आहे.
शिवशाहीर  प्रमुख पाहुणे
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रात आणि भारतातच नाही, तर परदेशातही पोहोचवणारे, शिवचरित्रावर हजारांहून अधिक कार्यक्रम करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या महाअंतिम फेरीचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पध्रेदरम्यान बाबासाहेबही स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यक्रम कधी – शनिवार, १४ फेब्रुवारी
कुठे – लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले (पूर्व)
किती वाजता – सायं. ५.३० वा.
कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. काही आसने निमंत्रितांसाठी राखीव

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta elocution competition grand final on saturday