मुंबई : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना ३० नोव्हेंबपर्यंत करोना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या करोना लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत टोपे मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी, यासाठी कवच कुंडल व युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले.

आता लसीकरणाची शिबीरे आणि वेळही वाढवली जात आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी विविध क्षेत्रांमधील मान्यवर, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

कोवॅक्सिन लसीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. मात्र कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा मधील अंतर कमी केले, तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांना केली.

मुंबई मध्ये लोकल ट्रेन मध्ये प्रवास करायचा असेल तर लशींच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावर ही अतिशय चांगली कल्पना आहे, अस मांडविया यांनी सांगितले. या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विविध राज्यांचे आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, लसीकरण अधिकारी सहभागी झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra aims for 100 percent vaccination by november 30 says rajesh tope zws