सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाची  न्यायालयात मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून आपल्यालाही दोषमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी सार्वजनिक विभागाचे तत्कालिन सचिव आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर १ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली असून खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा कायम ठेवली. 

या घोटाळ्यातून विशेष न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र आणि पुतण्यासह अन्य आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. मात्र त्याचवेळी देशपांडे यांना मात्र दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रकरणातून  दोषमुक्त करण्याची मागणी देशपांडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) देशपांडे यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. तसेच त्यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर देशपांडे यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १ फेब्रुवारीला ठेवत देशपांडे यांना दिलेला दिलासा कायम ठेवला.  दरम्यान, ही याचिका आणि भुजबळ कुटुंबियांना दोषमुक्त करण्याच्या विरोधात आपण केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयाकडे केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sadan scam case former information commissioner deepak deshpande acb akp