पोलिस आयुक्त राकेश मारिया यांचे स्पष्टीकरण समाधानकारक असले तरी काही मुद्दय़ांचा आणखी तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितला आहे. मारिया यांना मुख्यमंत्र्यांनी अंशत: ‘क्लीन चीट’ दिली आहे. त्यामुळे त्यांना तूर्तास अभय मिळाल्याचे मानले जात आहे.
गैरव्यवहाराचा आरोप असलेले आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याने मारिया हे वादात अडकले आहेत. त्यांनी लंडनहून परतल्यावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्या भेटीचा तपशील सांगितल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्या जीविताला अंडरवर्ल्डकडून धोका असल्याचे त्यांनी सांगितल्यावर त्यांना मुंबईत येण्यास सुचविले होते, असे मारिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.
पण एखाद्या सनदी अधिकाऱ्याने आरोप असलेल्या व देशाबाहेर गेलेल्या मोदींची शासकीय दौऱ्यावर असताना भेट घेणे हे उचित आहे का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. मोदी यांना केलेल्या मदतीमुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या वादात अडकल्या आहेत. त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाईची मागणी होत असताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचे समर्थन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राकेश मारिया यांच्यावर कारवाई केली, तर केवळ सनदी अधिकाऱ्यावर कारवाई केल्याची टीका होईल. तर मारिया यांना ‘क्लीन चीट’ दिली, तर अधिकाऱ्यांनी शासकीय दौऱ्यात परदेशात जाऊन फरारी आरोपींची भेट घेऊनही सरकार काहीच करीत नाही, असाही संदेश जाईल. तोपर्यंत तूर्तास ‘तळ्यात-मळ्यात’ ही भूमिका ठेवायची, असा सरकारचा विचार आहे. तरीही त्यांना आयुक्तपदी कायम ठेवायचे याकडे सरकारचा कल झुकेल, असे मानले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modigate rakesh maria